आ. पुराम यांचा तलाठी संघटनेकडून निषेध

0
11

गोंदिया,दि.30ःः-लोकप्रतिनिधीकडून लोकसेवकांचा वारंवार अपमान होत असल्याच्या घटना पुढे येत असताना सालेकसा येथील एका कार्यक्रमात आमदार संजय पुराम यांनी तलाठय़ांच्या संदर्भात अभद्र शब्दांचा वापर करून असाच एक प्रकार करून या घटनांमध्ये भर टाकली आहे. त्यामुळे आ. पुराम यांचा विदर्भ पटवारी संघाकडून निषेध नोंदविण्यात येत असून सोमवारी, २९ ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील तलाठय़ांनी आमदार संजय पुराम यांचा निषेधार्थ खा. नेते यांनी घेतलेल्या जनता दरबारावरच बहिष्कार टाकला तर जिल्ह्यातील सर्वच तलाठ्यांनी काळ्याफिती लावून कार्यालयीन काम केले. तर यासंबधीचे निवेदनही जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना दिले आहे.
यासंदर्भात विदर्भ पटवारी संघाने प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकात म्हटले आहे की, सालेकसा येथे आयोजित सुवर्ण जयंती जनजागृती मेळाव्यात आमदार संजय पुराम हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित असताना त्यांनी नागरिकांच्या दाखले देण्याच्या विषयावरून तलाठय़ांविषयी अभद्र शब्दांचा वापर करुन जनतेला भडकावण्याचे कार्य केले होते. तर यापूवीर्ही सालेकसा तालुक्यात देखील अशीच वागणूक आमदार पुराम यांच्याकडून तलाठय़ांना मिळाली होती. त्यामुळे वारंवार आ. पुराम यांच्याकडून होणारे हे प्रकार अशोभनिय असून त्यांच्या या वक्तव्याचे निषेध विदर्भ पटवारी संघाकडून नोंदविण्यात आले आहे.
दरम्यान, शुक्रवारी, २९ ऑक्टोबर रोजी खा. अशोक नेते यांनी जनता दरबाराचे आयोजन केले असता तलाठय़ांनी जनता दरबारावर बहिष्कार टाकून जिल्ह्यातील तलाठय़ांनी विदर्भ पटवारी संघाच्या नेतृत्वात काळ्याफिती लावून आ. पुराम यांचा निषेध केला. प्रसंगी तलाठय़ांना न्याय देण्याची मागणी जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांना निवेदन देऊन करण्यात आली आहे.