जिल्हा परिषद अध्यक्षांचा उपोषणाचा इशारा

0
5

भंडारा दि.५ ;: विविध विकास कामांचे नियोजन करून आवश्यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे करण्यात आली. तीन-चारवेळा जिल्हाधिकाऱ्यांकडे निधीबाबत मागणी करूनही अद्याप निधी प्राप्त झाला नाही. येत्या चार दिवसात निधीचे वितरण न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसण्याचा इशारा चक्क जिल्हा परिषद अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी दिला आहे.
तीन महिन्यापुर्वी जिल्हा वार्षिक नियोजन लेखाशिर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत भंडारा जिल्हा परिषदेने इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या विकास कामाचे नियोजन करून आवश्यक निधीची मागणी जिल्हा नियोजन समितीकडे केली होती. त्यानंतर तीन ते चार वेळा जिल्हा परिषदेने प्रस्तावित निधी देण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडे मागणी केली. परंतु जिल्हाधिकाऱ्यांकडून निधी प्राप्त झाला नाही.
महाराष्ट्र शासनाच्या ग्राम विकास विभागाच्या ६ आॅक्टोबरच्या निर्णयानुसार जिल्हा वार्षिक योजनेतील लेखानिर्ष ३०५४ व ५०५४ अंतर्गत प्राप्त होणाºया निधीतून इतर जिल्हा मार्ग व ग्रामीण मार्ग यांच्या कामाच्या अनुशंगाने कार्यान्वीत यंत्रणा निवडण्याबाबत पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हानिहाय समिती गठित केली होती.
शासनाच्या सदर निर्णयाविरोधात भंडारा जिल्हा परिषदेचे अध्यक्ष रमेश डोंगरे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात रिठ याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर दिलेल्या आदेशानुसार या शासन निर्णयाला स्थगिती दिली आहे. त्यानंतर मंजूर निधी जिल्हा परिषदेला वितरित करण्याबाबत जिल्हाधिकाºयांकडून मागणी करण्यात आली.
परंतु अद्यापही निधी वितरणाची कारवाई जिल्हाधिकारी कार्यालयाकडून झाली नाही. चार दिवसाच्या आत निधी वितरण करण्यात न आल्यास जिल्हा परिषद पदाधिकाऱ्यांसह जिल्हा परिषद अध्यक्ष उपोषणाला बसणार आहे. आता प्रशासन काय निर्णय घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.