यवतमाळच्या जैवविविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे  -सुधीर मुनगंटीवार

0
12

मुंबई दि. २९: यवतमाळ जिल्ह्याच्या जांब येथील जैव विविधता उद्यानाचे काम २६ जानेवारी २०१९ पर्यंत पूर्ण करावे अशा सूचना वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिल्या. काल यासबंधी आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीस साप्रवि राज्यमंत्री मदन येरावार, वन सचिव विकास खारगे यांच्यासह वन विभागाचे इतर अधिकारी उपस्थित होते.

या उद्यानासाठी ७ कोटी ८८ लाख रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता त्यातून करण्यात आलेल्या कामांचा ही वनमंत्र्यांनी आढावा घेतला. यात २१ कामे प्रस्तावित होती. त्यापैकी ५ कोटी ७१ लाख रुपयांची १३ कामे पूर्ण झाली असून उर्वरित कामे प्रगतीपथावर असल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. या कामाला आणखी वेग देण्यात यावा, यासंबधीच्या कामाचे वेळापत्रक निश्चित केले जाऊन त्याप्रमाणे उद्यानाची सर्व कामे वेळेत म्हणजे २६ जानेवारी २०१९ पूर्वी पूर्ण करावीत, याबरोबरच ऑक्सीजन पार्कचे  काम ही गतीने पूर्ण करावे असेही ते म्हणाले. या कामात लोकांना सहभागी करून घेऊन त्यांच्या चांगल्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना ही त्यांनी दिल्या. या दोन्ही ठिकाणी शाळांच्या सहली आयोजित केल्या जाव्यात, शालेय विद्यार्थ्यांनाही जैवविविधता उद्यान आणि ऑक्सीजन पार्क मधील झाडांचे महत्व समजून सांगितले जावे, त्यातून महसूल मिळवण्याचा प्रयत्न केला जावा असेही श्री. मुनगंटीवार यांनी यावेळी सांगितले. हत्तीखान्यातील जागेसंबंधी वन विभागाने अभ्यास करून निर्णय घेण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.