जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकला राष्ट्रवादीचा मोर्चा

0
18

भंडारा,दि.02ः-शहरातून सुरू असलेल्या ५४७-ई या राष्ट्रीय महामार्गाच्या बांधकामाअंतर्गत जिल्हा परिषद चौक ते राजीव गांधी चौकापर्यंतचे काम भंडारा नगर परिषदेने बंद पाडले. १५ दिवसांपासून काम बंद असल्याने नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. रस्त्याचे काम तात्काळ सुरू करावे, या मागणीसाठी जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या वतीने शनिवारी रास्ता रोको करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा नेण्यात आला.
भंडारा शहरातून जिल्हा परिषद चौक ते खातरोड असे राष्ट्रीय महामार्ग क्र मांक ५४७-ई चे काम केले जात आहे. परंतु, काही दिवसांपुर्वी हे काम थांबविण्याचे आदेश नगर पालिका प्रशासनाने दिले होते. त्यामुळे हे काम बंद पडले. परंतु, तोपर्यंत जिल्हा परिषद चौक ते साई मंदिरपर्यंत रस्त्याची एक बाजू पूर्णपणे खोदण्यात आली आहे. आजघडीला ती त्याच अवस्थेत असल्याने एकाच बाजुने वाहतूक सुरू आहे. हा मार्ग अत्यंत वर्दळीचा असल्याने अपघाताची भीती आहे. त्यामुळे या रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे, या मागणीसाठी राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी मोर्चा काढला. तत्पूर्वी महामार्गावर राष्ट्रवादी कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष नाना पंचबुद्धे, प्रदेश सरचिटणीस धनंजय दलाल यांच्या नेतृत्वात रास्तारोको आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात स्थानिक नागरिक व व्यापार्‍यांनीही सहभाग घेतला. त्यानंतर निवासी जिल्हाधिकार्‍यांना निवेदन देण्यात आले.
या आंदोलनात यशवंत सोनकुसरे, महेंद्र गडकरी, अँड. जयंत वैरागडे, अँड. विनयमोहन पशिने, बाबुराव बागडे, परवेजभाई पटेल, जुगल भोंगाडे, उमेश ठाकरे, अश्‍विनी बुरडे, अमर उजवणे, मधुकर चौधरी, सुनील साखरकर, शुभांगी खोब्रागडे, लोकेश खोब्रागडे, रामदास शहारे, नरेंद्र झंझाड, राजू हाजी सलाम, नितीन तुमाने, सुनील शहारे, प्रा. राजपूत, डॉ. रविंद्र वानखेडे, नरेंद्र बुरडे, सुमीत घोगरे, विजय खेडकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.