वाशिम येथे आजपासून ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव’

0
14

वाशिम, दि. २२ : राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत असलेल्या ग्रंथालय संचलनालयाच्यावतीने जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयामार्फत २२ व २३ डिसेंबर २०१८ रोजी वाशिम येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे ‘वत्सगुल्म ग्रंथोत्सव २०१८’चे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये वाचन संस्कृतीच्या प्रचार व प्रसार होण्यासाठी ग्रंथ प्रदर्शन व विक्री, परिसंवाद, काव्यवाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या कार्यक्रमांना जिल्ह्यातील जास्तीत जास्त साहित्यप्रेमींनी उपस्थित रहावे,असे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.

ग्रंथोत्सवानिमित्त आज, २२ डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजता राजे वाकाटक सार्वजनिक वाचनालय येथून ग्रंथ दिंडी काढण्यात येणार आहे. तसेच सकाळी ११ वाजता पालकमंत्री संजय राठोड यांच्या हस्ते जिल्हा क्रीडा संकुल येथे ग्रंथोत्सवाचे उद्घाटन होईल. सायंकाळी ६ वाजता हास्यकवी डॉ. मिर्झा रफी अहमद बेग यांचा ‘मिर्झा एक्सप्रेस’ हा हास्यविनोद कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.

२३ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता शालेय विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कार्यक्रम होणार आहे. त्यानंतर सकाळी ११ वाजता ‘ग्रंथ वाचन आणि विकास’ या विषयावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. ज्येष्ठ साहित्यिक बाबाराव मुसळे यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या या परिसंवादात राणी लक्ष्मीबाई कन्या शाळेचे शिक्षक मोहन शिरसाट, जिल्हाधिकारी कार्यालयाचे लेखाधिकारी शेख युसुफ सहभागी होतील. दुपारी ३ वाजता ‘वाह वाह क्या बात’ फेम  हास्यकवी मनोज मद्रासी यांच्या अध्यक्षतेखाली काव्य वाचन कार्यक्रम होईल. यामध्ये प्रा. फारुख जमन व डॉ. विजय काळे सहभागी होतील. सायंकाळी ४ वाजता ग्रंथोत्सव समारोपीय कार्यक्रम होणार आहे.

ग्रंथ विक्री व प्रदर्शनीचे आयोजन

            वत्सगुल्म ग्रंथोत्सावादरम्यान शासकीय मुद्रणालयाच्या विविध प्रकाशनाच्या स्टॉलसह विविध नामांकित लेखक कवी यांच्या प्रकाशनांचे २० स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील वाचनप्रेमींना एकाच ठिकाणी विविध ग्रंथ खरेदी करण्याची संधी प्राप्त होणार आहे. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त वाचनप्रेमींनी ग्रंथोत्सव व ग्रंथदालनांना भेट द्यावी, असे आवाहन ग्रंथोत्सव जिल्हा समन्वय समितीच्यावतीने करण्यात आले आहे.