गोंदिया जिल्ह्यात अल्पसंख्याक विध्यार्थ्यांसाठी लवकरच वसतिगृह

0
8

ङ्घ मुस्लिम समाजाच्या कब्रस्तानचा प्रश्न मार्गी लावण्याच्या जिल्हा प्रशासनाला सूचना
ङ्घ अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी घेतला जिल्हा आढावा
गोंदिया  दि. २२ : : गोंदिया जिल्ह्यात अल्पसंख्याक मुलांच्या अथवा मुलींच्या शिक्षणासाठी एकही वसतिगृह उपलब्ध नाही, ते तातडीने उपलब्ध व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने प्रस्ताव सादर करावा, अशा सूचना राज्य अल्पसंख्याक आयोगाचे अध्यक्ष हाजी अरफात शेख यांनी बैठकीत दिल्या. ३६ जिल्हे ३६ दिवस महाराष्ट्राच्या आढावा दौऱ्यावर ते आज गोंदिया जिल्ह्यात आले होते. गोंदियातील मुस्लिम कब्रस्तानचे आणि ख्रिश्चन समाजाच्या कब्रस्तानचा प्रश्नही मार्गी लावा, अशा सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दिल्या.
बैठकीला जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.राजा दयानिधी, पोलीस अधीक्षक हरिष बैजल, अप्पर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई. हाश्मी, आयोगाचे अधिकारी गणेश सुरवसे यांच्यासह शिक्षण विभाग, कौशल्य विकास विभाग, बांधकाम विभाग, मौलाना आझाद आर्थिक विकास महामंडळ, लीड बँक तसेच इतर विभागाचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.
रोजगार मेळावा घेतांना लोकप्रतिनिधी, जिल्हाधिकारी यांना निमंत्रीत करावे. अल्पसंख्याक समाजाच्या युवकांना मोठ्या प्रमाणात सहभागी करून घ्यावे तसेच त्याचा प्रचार-प्रसार मोठ्या प्रमाणावर व्हावा अश्या सूचना यावेळी देण्यात आल्या.
माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शाळेत शिकत असलेल्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिपचा लाभ मिळतो की नाही यावर नीट नियंत्रण राहावे असेही यावेळी सूचविण्यात आले.
बैठकी पूर्वी शीख समाज, ख्रिश्चन समाज, मुस्लिम समाज, जैन समाज आणि बौध्द समाजाच्या प्रतिनिधी मंडळींनी हाजी अरफात शेख यांची भेट घेऊन निवेदने सादर केली.