सा.बां. विभागाने घेतली राष्ट्रवादीच्या आंदोलनाची दखल

0
13

अर्जुनी मोरगाव,दि.22 : निद्रिस्त प्रशासनाला जागे करण्यासाठी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे वडसा – अर्जुनी – कोहमारा राज्यमार्गावरील खड्ड्यात बेशरमची झाडे लावून शासन व प्रशासनाचा निषेध नोंदविला.त्याचे वृत्त प्रसारमाध्यमानी प्रकाशित केल्यानंतर सार्वजनिक बांधकाम  उपविभाग अर्जुनी मोरगावद्वारे अखेर खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निप्पल बरैय्या यांनी राष्ट्रवादीचे नेते खा. प्रफुल्ल पटेल यांच्या नेतृत्वात जनहितासाठी आंदोलन सातत्याने सुरू ठेवणार असल्याचे प्रसिद्धी पत्रकाद्वारे म्हटले आहे. .

राज्य मार्गावरील इटखेडा-इसापूर-खामखुरा ते जिल्हा सीमेपर्यंतच्या गौरनगरपर्यंत अख्खा राज्यमार्ग खड्ड्यात घुसला आहे. सा.बां. उपविभाग अर्जुनी मोरगाव विभाग गोंदियाद्वारे याकडे दुर्लक्ष केले होते. परिसरामधील जनतेचे यावर होणारे अपघात तसेच विद्यार्थ्यांची शाळा, महाविद्यालयात येण्यासाठीची कसरत जिवघेणी ठरली हाती. त्यातच नागमोडी वळणावर ट्रकचे अपघात बघता दिशादर्शक फलक, रिफ्लेक्टर, वळणाचे रुंदीकरण करण्यात यावे, यासाठी १८ डिसेंबरला राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसद्वारे खड्ड्यात बेशरमची झाडे लावून तीव्र निषेध नोंदविला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाकडून सदर आंदोलनाची दखल घेऊन रा.वि.का.चे तालुकाध्यक्ष निप्पल बरैय्या यांना तत्काळ काम सुरू करण्यासंदर्भात नुकतेच पत्र दिले असून त्यासंदर्भात खड्डे भरण्याचे कामसुद्धा सुरू झाले आहे. परंतु नागमोडी मार्गाचे रूंदीकरण, दिशादर्शक फलकाची रंगरंगोटी, रिफ्लेक्टर लावणे तसेच कडेचे गवत व झाडेझुडपे काढावी अन्यथा तीव्र आंदोलन करणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष निप्पल बरैय्या, युवक काँग्रेसचे तालुकाध्यक्ष योगेश नाकाडे, उद्धव मेहंदळे, नितीन धोटे, संजय राऊत, प्रमोद राऊत, केशव उके, शरद मिसार, उद्धव मुंगमोडे, मोरेश्वर संग्रामे, क्रिष्णा पारधी, मिलिंद येलपुरे, राजेंद्र मिसार, सन्नी पालीवाल, संदेश नेवारे, सचिन बरैय्या, मनोहर सोनवाने, चंद्रशेखर ठाकरे, कमलेश राऊत, मेघश्याम भावे, संतोष कोरडे, रमेश मानकर, होमेश्वर संग्रामे, देवराम दुनेदार व इतरांनी दिला आहे. .