तिरोडा येथे महाआरोग्य शिबिर व आरोग्य प्रदर्शन

0
7

तिरोडा,दि.22 : माजी पंतप्रधान स्व. अटलबिहारी वाजपेयी यांच्या जयंतीनिमित्त आमदार विजय रहांगडाले यांच्यावतीने २४ व २५ डिसेंबरला महाआरोग्य शिबिर व आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले आहे. यात तज्ञ डॉक्टरांकडून तपासणी, सल्ला व औषधोपचार करण्यात येणार असल्याने जनतेने या शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले.माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे २५ डिसेंबरला जयंतीदिनानिमित्त तिरोडा-गोरेगाव विधानसभा क्षेत्राचे आ. विजय रहांगडाले यांनी २४ व २५ डिसेंबरला उत्तर बुनियादी शाळेच्या पटांगणावर नि:शुल्क महाआरोग्य शिबिर व आरोग्य प्रदर्शनाचे आयोजन केले असून यात गंभीर आजार असलेल्या रुग्णांना शस्त्रक्रिया व औषधोपचाराकरिता महाराष्ट्र शासनाच्या महात्मा फुले योजनेचा लाभ घेता येणार आहे. या शिबिराचे उद्घाटन २४ डिसेंबरला सकाळी ११ वाजता जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पोलीस अधीक्षक हरीश बैजल यांच्या हस्ते होणार आहे. विशेष अतिथी म्हणून वैद्यकीय महाविद्यालय गोंदियाचे अधिष्ठाता डॉ. विनायक रूखमोडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.व्ही.एस. पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिल निमगडे, डॉ.एल.एल. बजाज उपस्थित राहणार आहेत. उपजिल्हा रुग्णालय तिरोडाचे अधीक्षक डॉ. हिम्मत मेश्राम यांच्यासह जिल्ह्यातील तज्ञ डॉक्टरांकडून हृदयरोग, स्त्रीरोग, नेत्रविकार, क्षयरोग, विकृती, बालरोग, अस्थिरोग, मानसिक रोग, कुष्ठरोग, कान, नाक, घसा, दंतरोग, त्वचारोग आदींवर मोफत तपासणी, सल्ला व औषधोपचार करण्यात येणार असून गंभीर आजार किंवा शस्त्रक्रिया व औषधोपचारकरिता महात्मा फुले महाराष्ट्र शासनाच्या योजनेचा लाभ गरजूंना घेता येईल.या आरोग्य प्रदर्शन व महाशिबिराचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन आ. विजय रहांगडाले यांनी केले आहे. .