गरजू व्यक्तींना व्यवसाय उभारणीसाठी पतपुरवठा करा-सुनील मनचंदा  

0
12
  • नाबार्ड’च्यावतीने एक दिवसीय बँकर्स कार्यशाळा

वाशिम, , दि. २९ :: गरजू व पात्र लाभार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी व स्वयंपूर्ण बनण्यासाठी शासनाची महामंडळे व विविध योजनांच्या माध्यमातून बँकेच्या सहाय्याने कमी व्याज दराने दीर्घ मुदतीचे कर्ज देण्यात येते. मात्र या योजनांमध्ये बँकांची भूमिका महत्त्वाची असते. अशा प्रकरणांमध्ये गरजू व पात्र व्यक्तींना बँकांनी वेळेत व पुरेसे अर्थसहाय्य उपलब्ध करून देवून आपले सामाजिक दायित्व पार पाडावे, असे आवाहन भारतीय स्टेट बँकेच्या अकोला विभागाचे सहाय्यक महाव्यवस्थापक सुनील मनचंदा यांनी केले. ‘नाबार्ड’च्यावतीने आरसेटी येथे नुकत्याच झालेल्या एक दिवसीय बँकर्स कार्यशाळेत ते बोलत होते.

यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक दत्तात्रय निनावकर, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे, नाबार्डचे सहाय्यक महाव्यवस्थापक विजय खंडरे आणि सर्व बँकांचे जिल्हा समन्वयक व शाखा व्यवस्थापक उपस्थित होते.श्री. मनचंदा म्हणाले, केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून विविध सामजिक सुरक्षा योजना, मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ तसेच इतर आर्थिक विकास महामंडळे, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती कार्यक्रम यासारख्या योजनांच्या माध्यमातून वैयक्तिक तसेच स्वयं सहाय्यता बचत गटांसाठी कर्ज योजना राबविल्या जातात. या योजनांमध्ये बँकांनी सहभाग देवून त्यांच्याकडे दाखल झालेल्या पात्र प्रकरणांत अर्थसहाय्य करावे, असे त्यांनी सांगितले.

श्री. निनावकर म्हणाले, नीती आयोगाने वाशिम जिल्ह्याची निवड आकांक्षित जिल्हा म्हणून केली आहे. या अंतर्गत राबविण्यात येत असलेल्या उपक्रमांमध्ये आर्थिक समावेशकता हा महत्वाचा मुद्दा असून यामध्ये जिल्ह्याची कामगिरी सुधारण्यासाठी बँकांनी शेतीपूरक व्यवसाय कर्ज तसेच इतर व्यावसायिक कर्जांना पतपुरवठा करणे आवश्यक असल्याचे सांगितले.श्री. खडसे म्हणाले, देशाच्या विकासात नाबार्ड व बँकांचे महत्वाचे योगदान आहे. आजही बँकांच्या माध्यमातून शासनच्या विविध रोजगार निर्मिती कार्यक्रमांची अंमलबजावणी होत आहे. मुद्रा योजना, प्रधानमंत्री रोजगार निमिर्ती कार्यक्रम आदी योजनांमुळे अनेक बेरोजगार युवक स्वतःच्या पायावर उभा राहिले आहेत. अशा लाभार्थ्यांच्या यशोगाथा समाजासमोर आणण्यासाठी बँकांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

श्री. खंडरे यांनी प्रास्ताविकात कार्यशाळा आयोजनाचा हेतू विशद केला. तसेच पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे ग्रामीण भांडारण योजना, महाराष्ट्र राज्य जीवनोन्नती कार्यक्रम, संयुक्त देयता समूह, स्वयं सहाय्यता समूह, दुग्ध व्यवसाय, शेली संगोपन तसेच शेतीपूरक व्यवसाय याविषयी माहिती दिली.आरसेटीचे आशिष राऊत यांनी आरसेटीमार्फत राबविण्यात येत असलेल्या प्रशिक्षण कार्यक्रमांची माहिती दिली. तसेच या कार्यक्रमातील प्रशिक्षणार्थींना बँकांनी पतपुरवठा केल्यास त्यांना व्यवसाय उभारणीसाठी मदत होईल, असे सांगितले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा अग्रणी बँकेचे दीपक नारसे, आरसेटीचे योगेश चव्हाण, महेंद्र सम्रत यांनी परिश्रम घेतले.