गोवर रुबेला लसीकरणामध्ये सुटलेल्या मुलांचा शोध घेवून लसीकरणाचे प्रमाण वाढवावे- जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे

0
17

गोंदिया,, दि. २९ :. : गोवर रुबेला मोहिमेचा लाभ पालकांनी घेवून आपल्या मुला-मुलींना गोवर रुबेला हे दोन्ही रोग होण्यापासून वाचवावे. तसेच यंत्रणांनी या मोहिमेला शंभर टक्के यशस्वी करण्याकरीता शाळेतील, अंगणवाडीतील व शाळाबाह्य मुलांचा शोध घेवून गोवर रुबेला लसीकरणाचे प्रमाण वाढवावे, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी डॉ.बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी एस.ई.हाश्मी, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष धार्मिक, शिक्षणाधिकारी उल्हास नरड, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.वेदप्रकाश चौरागडे, जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
यावेळी जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी मोहिमेला यशस्वी करण्यासाठी आजपावेतो केलेल्या सर्व घटनाक्रमांचा आढावा सभेत सादर केला. ९ महिने ते १५ वर्षापर्यंत जवळपास ३,६५,९५८ लाभार्थ्यांचे लसीकरण करण्याचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी प्रत्येक शाळेत लसीकरण सत्राचे आयोजन करण्यात आले. यामध्ये ९० टक्के पेक्षा कमी लसीकरण झालेल्या शाळा ३५५, ९१ टक्के पेक्षा जास्त लसीकरण झालेल्या शाळा ७५७, शंभर टक्के लसीकरण झालेल्या शाळा ३५२ आहेत. सुटलेल्या शाळेतील मुलांना उपकेंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय व जिल्हा रुग्णालयात कव्हर करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. ३,६५,९५८ पैकी २४ डिसेंबर २०१८ पर्यंत २,७५,१८७ लाभार्थी कव्हर झाले आहे. अशी माहिती बैठकीत देण्यात आली.
सभेला डब्ल्यू.एच.ओ.चे जिल्हा समन्वयक डॉ.एफ.ए.मेश्राम, आदिवासी विकास प्रकल्प सहायक अधिकारी व्ही.तितीरमारे, आय.एम.ए.चे अध्यक्ष डॉ.निर्मला जयपुरीया, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सी.डब्ल्यू वंजारे, डॉ.विवेक येळे यांच्यासह जिल्हास्तरीय अधिकारी व पर्यवेक्षक उपस्थित होते. संचालन जिल्हा माताबाल संगोपन अधिकारी डॉ.अनंत चांदेकर यांनी केले. सभेच्या यशस्वीतेसाठी पर्यवेक्षक ए.एस.वंजारी यांनी सहकार्य केले.