नागरिकांच्या संघर्षानंतर गणखैऱ्यात उड्डाणपूल मंजूर

0
9

गोरेगाव,दि.04 : तालुक्यातील गणखैरा येथे गोंदिया-बल्लारशाह मार्गावरील एलसी.नं. जीएलएफ-७ येथे दक्षिण पूर्व मध्ये रेल्वेचे वरिष्ठ विभागीय अभियंत्याने उड्डाणपूल मंजूर केला आहे. या उड्डाणपुलाच्या मागणीकरिता सर्व गणखैरा ग्रामवासीयांसह परिसरातील नागरिकांनीसुद्धा वेळोवेळी संघर्ष मागील २०१७ पासून सतत पाठपुरावा करणे सुरू होते. .

या ठिकाणी रेल्वे भुयारी मार्गाचे ७० टक्के काम पूर्ण झाले होते. विशेष म्हणजे हे काम सुरू असताना स्थानिक ग्रामपंचायतची नाहरकत न घेता काम सुरू करण्यात आले होते. सुरुवातीला काय काम सुरू आहे हे ग्रामवासीयांना कळले नव्हते. पण जेव्हा त्यांनी रेल्वे भुयारी मार्ग आहे, असे सांगितले तेव्हा ग्रामपंचायतचे पदाधिकारी प्रत्यक्षात पाहणी करायला गेले, तेव्हा त्यात फार दोषपूर्ण काम असल्याचे आढळले. हा भुयारी मार्ग गणखैरा गावाकडे जाताना एल आकाराचा असल्यामुळे गावाकडून येणाऱ्या लोकांना किंवा वाहनांना समोरून येणारे वाहन दिसत नसल्यामुळे या ठिकाणी केव्हाही अपघात होऊ शकतो असे निदर्शनास आले. तसेच भुयारी मार्गाजवळ दोन्ही बाजूने अंदाजे २० फूट उतार खोदलेला आहे. या ठिकाणी पावसाळ्यात पाणी साचून राहील, परंतु रेल्वे प्रशासनाकडून साचलेले पाणी जवळच्या ५०५ मिटर अंतरावर असलेल्या ४.८० मिटर खोल असलेल्या नाल्यावर पाइप घालून काढण्यात येईल असे सांगण्यात आले. पण नाल्याकडे पाणी जाताना मध्यभागी सपाट भूपृष्ठ असल्याने पाणी नाल्याच्या दिशेने पाइपच्या साह्याने वाहणार नाही असे अधिकारी व पदाधिकारी यांच्या निदर्शनास आले. अशा प्रकारे हा भुयारी मार्ग जनतेला धोकादायक आहे व भविष्यात अपघात न होण्याच्या दृष्टीने व सदरच्या भुयारी मार्गाजवळील खोल भागात पाणी साचल्याने सदरचा रस्ता बंद होईल. त्यामुळे गावांचा संपर्क तुटेल. त्यामुळे लोकांची वित्तहानी, जीवितहानी होण्याची दाट शक्यता आहे. असे चौकशी अहवालात तहसील कार्यालयाने सादर केले होते. ही सर्व बाब रेल्वे प्रशासन, जिल्हाधिकारी, केंद्रीय मंत्री, आ. परिणय फुले, स्थानिक आ. विजय रहांगडाले, भाजपा जिल्हाध्यक्ष हेमंत पटले यांना दिली. यावर या सर्व नेते मंडळींनी पाठपुरावा करून अखेर गणखैरा ग्रामवासी व परिसरातील नागरिकांच्या प्रयत्नांना यश मिळाले आहे. यामध्ये विशेष भूमिका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांना पत्र पाठवून अखेर उड्डाण पुलाची मंजुरी मिळवून दिली. त्याबद्दल त्यांचे गावकऱ्यांनी आभार मानले आहे. या उड्डाणपुलाच्या मंजुरीकरिता सरपंच अनंता ठाकरे, विनोद पारधी, उषा रहांगडाले, वैशाली तुरकर, तेजेंद्र हरिणखेडे, अल्का पारधी, टोलीराम पारधी, विजय कामळे, चंद्रशेखर कापसे, परमेश्वर कामळे, भुमेश पारधी व परिसरातील नागरिकांनी अथक परिश्रम घेतले. .