७ फेब्रुवारी रोजी नागपुरात होणार रमाईचा जागर

0
23

नागपूर,दि.04 : महामानव भारतरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्यात त्यांच्या पत्नी रमाई आंबेडकर यांचाही मोलाचा वाटा आहे. त्यामुळे यंदा नागपुरात रमाईच्या कार्यावर प्रकाश टाकण्यासाठी रमाईचा जागर आयोजित करण्यात आला आहे. यासाठी रमाईच्या जयंतीनिमित्त विविध संघटनांनी विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. यासोबतच रमाई आंबेडकर यांचे भाचे व नातसून सुद्धा नागपुरात येणार आहेत हे विशेष.
स्त्रीभूषण रमाई आंबेडकर संस्थेच्यावतीने डॉ. आंबेडकर महाविद्यालय दीक्षाभूमी येथील दादासाहेब कुंभारे सभागृह येथे ७ फेब्रुवारी रोजी रमाई आंबेडकर जयंती महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला रमाई आंबेडकरांचे भाचे उमेश शंकर धात्रे (मुंबई) आणि नातसून विनिता विजय धात्रे (वणंद) हे विशेष अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. यासोबतच भदंत नागदीपंकर, आशा मडावे, लता राजगुरू, अनिल वासनिक, दिलीप वानखेडे, अमोल साळुंखे, दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य विलास गजघाटे, महेंद्र मडावे प्रमुख पाहुणे राहतील. राजकुमार वंजारी हे अध्यक्षस्थानी राहतील. तसेच यादव मेश्राम, ईश्वरदास बन्सोड, कुवर रामटेके, नवल राजेंद्र कापसे प्रामुख्याने उपस्थित राहतील. यावेळी स्त्रीभूषण रमाई हिंदी पुस्तकाचे प्रकाशन आणि विविध क्षेत्रात नावलौकिक करणाऱ्या रमाईच्या लेकींचा तसेच आंबेडकरी चळवळीतील कार्यकर्त्यांचा कार्य गौरव होईल.

प्रियदर्शी सम्राट अशोक बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने ७ फेब्रुवारी रोजी भगवाननगर पोस्ट आॅफिस ग्राऊंडवर रमाई जन्मोत्सव आयोजित करण्यात आला आहे. यानिमित्त आनंदराज आंबेडकर हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहतील. त्यासोबतच देशभरात गाजत असलेले ‘शिवाजी अंडरग्राऊंड इन भीमनगर मोहल्ला’ हे महानाट्य सादर करण्यात येणार आहे. याशिवाय विविध कार्यक्रम होतील. संस्थेचे सल्लागार शिरीश फुलझेले यांनी पत्रपरिषदेत ही माहिती दिली. यावेळी संस्थेचे अध्यक्ष अनिकेत कुत्तरमारे, शितल गडलिंग, सिद्धार्थ बनसोड, शुभम दामले पंकज नाखले, नंदू पारखंडे उपस्थित होते.