आत्मविश्‍वासाच्या बळावर भरारी घ्या

0
17

भंडारा : बचत गटाच्या व्यवसायामुळे महिलांच्या हातात पैसा आला. त्यामुळे कुटुंबाचा तिच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता तिला घरातील निर्णय प्रक्रियेत सामावून घेतले जाते. महिलांनी इच्छाशक्ती व आत्मविश्‍वास कायम ठेवावा आणि स्वकर्तृत्वाच्या बळावर आकाशात झेप घ्यावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी डॉ. माधवी खोडे यांनी केले.
महिला आर्थिक विकास महामंडळ व महिला, बालविकास कार्यालयाच्या विद्यमाने शुक्रवारला आयोजित महिला मेळाव्यात त्या बोलत होत्या. यावेळी जिल्हा कृषी अधिकारी आर.बी. चलवदे, आत्माचे प्रकल्प संचालक प्रज्ञा गोडघाटे, जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक संजय पाठक, नाबार्डचे उपमहाव्यवस्थापक अरविंद खापर्डे, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा सावळे, महिला व बाल कल्याण अधिकारी रविंद्र चव्हाण, माविमच्या जिल्हा समन्वयक ज्योती निंभोरकर उपस्थित होते. यावेळी डॉ. खोडे म्हणाल्या, महिला बचत गटांनी कोणतेही प्रॉडक्ट तयार करताना तो कच्चा माल म्हणून विकू नये तर त्याचे व्हॅल्यु अँडीशन करून तो जास्त किंमतीत विकावा. जसे तांदुळ महोत्सवामध्ये शेतकर्‍यांनी धानाऐवजी तांदुळ विकला. त्यामुळे त्यांना जास्त नफा मिळाला. असाच विचार महिला बचतगटांनी करावा. महिलांनी मुलगा व मुलीमध्ये फरक न करता त्यांना समानतेची वागणूक द्यावी तरच पुढची पिढी सुदृढ विचारांची होईल असे म्हटले.यावेळी कृषी अधिकारी आर.बी. चलवदे यांनी शेतकरी महिलांसाठी असलेल्या योजनांची माहिती दिली. बालविकास अधिकारी रवींद्र चव्हाण यांनी महिलांसाठी असलेले कायद्यांची माहिती दिली. महिलांनी कुणालाही न घाबरता त्यांच्या झालेल्या अत्याचाराची तक्रार करावी, असे सांगितले. संचालन देशमुख यांनी तर आभारप्रदर्शन आंबेडारे यांनी केले. (शहर प्रतिनिधी)