तेंदुपत्ता बोनस घोटाळय़ाची चौकशी करा

0
16

सिरोंचा,दि.07ः-तालुक्यातील बेजुरपल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणार्‍या बेजुरपल्ली व जार्जपेटा येथे २0१६-१७ मधील तेंदूपत्ता बोनस वाटपामध्ये ग्रामपंचायत सचिव व सरपंच पेसा कोषाध्यक्ष यांनी ९ लाख ८0 हजार रूपयांची रक्कम तेंदू मजुरांना वाटप न करता परस्पर गहाळ केल्याचे प्रकरण उघडकीस आले आहे. सदर प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करावा, अशी मागणी बेजुरपल्ली व जार्जपेटा येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.निवेदन देताना वाले वेलादी, गावडे जोगा, पुरा वेलादी, सुंगा वेलादी, शंकरी गावडे, कोहला मडे, कोमा वेलादी, बंडे मडे, राजय्या पुंजम, मुल्ला वेलादी, वंजा वेलादी, मासा वेलादी, चंद्रा गावडे, सिरिया मडे, रामा वेलादी, डुम्मा वेलादी, बोडका गावडे, लच्चा मडे, कारे वेलादी, सुंगा वेलादी व ग्रामस्थ उपस्थित होते.
निवेदनात म्हटले आहे की, सिरोंचा तालुक्यातील बेजुरपल्ली ग्रामपंचायतीअंतर्गत येणार्‍या बेजुरपल्ली व जार्जपेटा येथील तेंदू मजुरांनी २0१६-१७ मध्ये तेंदूपत्ता संकलन केले. या तेंदूपत्ता संकलणाची बोनस रक्कम ३६ लाख ५0 हजार रूपयांमधून प्रती शेकडा १४ रूपयेप्रमाणे बोनस रक्कम वाटप न करता सचिव व सरपंच कोष समितीने प्रती शेकडा १0 रूपये ८ पैसेप्रमाणे बोनसची रक्कम वाटप करून मजुरांची फसवणूक केली आहे. उर्वरित ९ लाख ८0 हजार रूपयांची रक्कम परस्पर हडप केल्याचे समोर आले आहे. हडप केलेल्या रक्कमेची चौशी करून सचिव व सरपंच कोष समिती सदस्यांवर फौजदारी कारवाई करावी, त्यांच्याकडून हडप केलेल्या रक्कमेची वसुली करून १४ रूपयेप्रमाणे बोनस रक्कम तेंदूपत्ता मजुरांना वाटप करावी, अशीही मागणी बेजुरपल्ली व जार्जपेटा येथील ग्रामस्थांनी निवेदनातून केली आहे.