विकास कामावर निधी खर्च करतांना गुणवत्तापुर्ण कामे व्हावीत याची दक्षता घ्या- पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार

0
13

गडचिरोली जिल्हा वासियांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे,

याची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी-पालकमंत्र्यांनी दिले निर्देश

गडचिरोली,दि.13: संजय गांधी निराधार योजनेच्या अनुदानाची नुकतीच रक्कम वाढविली आहे. सर्व निराधार व्यक्तींच्या खात्यात ती रक्कम यथाशिघ्र जमा करावी. यात हयगय करु नये असे निर्देश देत असतांनाच जिल्ह्यातील रस्त्यांच्या बांधकामाकडे विशेषत्वाने लक्ष घालून चांगली यंत्रणा निश्चित करावी जेणे करुन दुर्गम भागात शासकीय योजनांची कामे करतांना अडचण निर्माण होणार नाही. शासकीय योजनांवर, विकास कामांवर निधी खर्च करतांना गुणवत्तापुर्ण कामे व्हावीत याची दक्षता घ्यावी. आदिवासी बहूल जिल्ह्यात, गडचिरोली जिल्हा वासियांची सेवा करण्याची संधी मिळाली आहे याची जाणीव ठेवून अधिकाऱ्यांनी कामाची गती वाढवावी असे निर्देश आज पालकमंत्री तथा राज्याचे वने, वित्त व नियोजन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दिले. गडचिरोली जिल्हाधिकारी कार्यालयात नियोजन विभागाच्या सभागृहात विकास कामासंबंधी आयोजित बैठकीत ते बोलत होते. कृषी, सार्वजनिक बांधकाम, पोलिस व जिल्हा परिषद येथील राबवित असलेल्या विकास कामाचा आढावा पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आला.

यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा योगिता भांडेकर, खासदार अशोक नेते, आमदार डॉ. देवराव होळी, कृष्णा गजबे, जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यपालन अधिकारी डॉ. विजय राठोड, जिल्हा पोलिस अधिक्षक शैलेष बलकवडे, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, सहाय्यक जिल्हाधिकारी डॉ. इंदुराणी जाखड,  गडचिरोली नगराध्यक्षा योगिता पिपरे,वडसा नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शालू दंडवते, जिल्हा परिषद उपाध्यक्ष अजय कंकडालवार, जिल्हा नियोजन अधिकारी टी.एस. तिडके प्रामुख्याने उपस्थित होते.

आढावा सभेत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी जिल्हयातील महत्वाच्या विभागात आस्थापनावरील  भरलेल्या तसेच रिक्त पदांची माहिती दिली. पालकमंत्री मुनगंटीवार यांनी यामध्ये 2002 च्या शासन निर्णयान्वये अत्यंत महत्वाची रिक्त पदे तातडीने भरावीत असे विभाग प्रमुखांना सुचना केल्या. महत्वाची पदे रिक्त राहील्यास विकास कामे करीत असतांना अडचण निर्माण होत असते, यात दुमत नाही. त्यामुळेच प्रत्येक विभागानी आपल्या विभागाकडून रोजगार कसा उपलब्ध करता येईल याचा विचार करावा व युवकांना रोजगार उपलब्ध करुन द्यावा. जिल्हयातील जिल्हा स्टेडीयम, तालुका स्टेडीयम, चामोर्शी बस स्टँड, मार्कंडा मंदीर विकास आराखडा आदि. विकास कामाचे सादरीकरण पुढील बैठकीत सादर करण्याच्या सुचना सुध्दा यावेळी पालकमंत्री मुनगंटीवार यांनी दिल्या.

रस्ते हा विकासाचा केंद्र बिंदू असून रस्ते बनवितांना रस्त्यांची गुणवत्ता दर्जेदार असावी याची काळजी घेऊन  ते कमीत कमी वेळेत कसे तयार होतील याकडे लक्ष घालावे. असे निर्देश सार्वजनिक बांधकाम विभागाला यावेळी दिले. रस्त्याचे काम गुणवत्तेनुसार होत आहे की नाही ते तपासण्याकरीता पथक तयार करण्यात येईल. पावसाळयात  अति दुर्गम काही भागात पुल लहान असल्यामुळे रहदारी पुर्णपणे बंद होतात. तिथे पुलाची उंची वाढविण्यात येईल असे सांगितले.

दुर्गम भागात रोड बांधकामाकरीता टेंडर काढले तरी कोणी टेंडर भरण्यास तयार नसतात असे जिल्हाधिकाऱ्यांनी  पालकमंत्री यांच्या निर्देशनास आणून दिले. तसेच त्यांनी यावर उपाय म्हणून छत्तीसगढच्या राज्याच्या धर्तीवर जिल्हा निर्माण समिती तयार करुन ही समस्या कमी करता येऊ शकते असे म्हणाले.कृषी विभागाकडून सिचंनाबद्दलची माहिती जाणून घेतली. शेतकऱ्यांना खतांचा व बियाणांचा  तुटवडा होणार  नाही याकडे लक्ष घालण्याचे यावेळी त्यांनी सांगितले.  कृषी विभागात रोजगार संधी जास्त असल्यामुळे याकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे मत त्यांनी यावेळी व्यक्त केले.चंद्रपूर जिल्ह्यात नागरिकांच्या तक्रारी सोडवण्यासाठी पालकमंत्री तक्रार निवारण यंत्रणा हॅलो चंद्रपूर सुरु करण्यात आली आहे . तिचा अभ्यास करून गडचिरोली जिल्ह्यात हॅलो गडचिरोली ही तक्रार निवारण यंत्रणा राबविण्याचे निर्देश त्यांनी जिल्हाधिकारी यांना दिले.बैठकीत सर्व कार्यालय प्रमुख व पदाधिकारी उपस्थित होते.