११० कोटी रुपयातून बनणार दोन्ही रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपूल

0
14

गोंदिया,दि.22 : गोंदिया-बालाघाट मार्गावरील मरारटोली-हड्डीटोली येथील रेल्वे क्रॉसिंगमुळे अनेकदा वाहतुकीची कोंडी होते. शिवाय दोन्ही रेल्वे क्रॉसिंगमुळे शहरवासीयांनासुद्धा त्रास सहन करावा लागत होता. ही समस्या मार्गी लावण्यासाठी या दोन्ही मार्गावर दोन उड्डाणपूल तयार करण्याची मागणी आमदार गोपालदास अग्रवाल यांनी शासनाकडे लावून धरली होती. त्याला शासनाने मंजुरी दिली असून या दोन्ही उड्डाणपुलासाठी ११० कोटी रुपयाचा निधी मंजूर केला आहे.गोंदिया- बालाघाट मार्गावरील या मार्गावरून मध्यप्रदेशाकडून येणाऱ्या आणि शहरातील वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असते. या मार्गावर मरारटोली परिसरात रेल्वे क्रॉसिंग गेटमुळे या भागातील अनेकदा वाहतूक दिवसभरात ठप्प होते. त्यामुळे बालाघाटकडून येणाऱ्या आणि गोंदियाकडून जाणाऱ्या वाहन चालकांनासुद्धा याचा फटका बसतो. लवकरच गोंदिया-जबलपूर रेल्वे मार्गाचे काम सुरू होणार असून यामुळे या समस्येत अधिक वाढ होण्याची शक्यता नाकारता येत नाही. तर हीच समस्या हड्डीटोली परिसरात उड्डाणपूल तयार करण्याची मागणी शहरवासीयांकडून केली जात होती. त्याचीच दखल घेत आ.अग्रवाल यांनी राज्य सरकार व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेऊन या दोन्ही उड्डाणपुलांना मंजुरी देण्याची मागणी केली होती. त्याचीच दखल घेत केंद्रीय रस्ते निर्माण निधी अंतर्गत मरारटोली येथे उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ६० कोटी रुपये आणि हड्डीटोली रेल्वे क्रॉसिंगवर उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी ५० कोटी असा एकूण ११० कोटी रूपयाचा निधी शासनाने मंजूर केला आहे. .

यामुळे शहरवासीयांनी आ. गोपालदास अग्रवाल यांचे आभार मानले आहे. लवकरच या उड्डाणपुलाच्या बांधकामाला सुरूवात करण्यात येणार आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वी राज्याच्या अर्थसंकल्पात शहरातील उड्डाणपुलाच्या बांधकामासाठी राज्य सरकारने ८३ कोटी रूपयाचा निधी मंजूर केला होता. त्यानंतर आता दोन्ही उड्डाणपुलाची समस्या मार्गी लागल्याने आ.अग्रवाल यांचे जिल्हा कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष पुरूषोत्तम कटरे,के. आर. शेंडे, प्रफुल्ल अग्रवाल, अशोक चौधरी, चेतना पराते,दीपक नशिने,राकेश ठाकूर, गौरव वंजारी,पन्नालाल सहारे, आलोक मोहंती,हरीश तुळस्कर,संदीप रहांगडाले, शकील मंसुरी, असित अग्रवाल, निर्मला मिश्रा, सुनील भालेरवा, पराग अग्रवाल,सुनील तिवारी, शीलू ठाकूर, अपूर्व अग्रवाल यांनी आभार मानले..