पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समितीची बैठक

0
23

यवतमाळ, दि. 4 : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत येणा-या जिल्हा वार्षिक योजना, सर्वसाधारण योजना व आदिवासी उपयोजना समितीची बैठक जिल्ह्याचे पालकमंत्री मदन येरावार यांच्या अध्यक्षतेखाली नियोजन सभागृह येथे घेण्यात आली. बैठकीला आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके उपस्थित होते.यावेळी महसूल राज्यमंत्री संजय राठोड, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा माधुरी आडे, आमदार सर्वश्री निलय नाईक, ख्वाजा बेग, वजाहत मिर्झा, मनोहर नाईक, संजीवरेड्डी बोदकुरवार, राजू तोडसाम, राजेंद्र नजरधने, नगराध्यक्षा कांचन चौधरी, जिल्हाधिकारी अजय गुल्हाने, मुख्य कार्यपालन अधिकारी जलज शर्मा, जिल्हा नियोजन अधिकारी गिरीष शास्त्री, नियोजन समितीचे नामनिर्देशीत सदस्य डॉ. किशोर मोघे, समाजकल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त किशोर भोयर, नियोजन उपायुक्त श्री. खडसे आदी उपस्थित होते.

आरोग्य विभागाचा आढावा घेतांना पालकमंत्री मदन येरावार म्हणाले, जिल्ह्यात जेथे ओपीडी जास्त आहे, तेथे त्वरीत डॉक्टरांची नियुक्ती करावी. पिण्याचे शुध्‍द पाणी हा महत्वाचा विषय आहे. त्यामुळे प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये 14 वित्त आयोगातून वॉटर फिल्टर लावल्यास त्याचा फायदा रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना होईल. विद्युत विभागाने गावस्तरावर ग्रामविद्युत व्यवस्थापक निवडण्यासाठी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी ग्रामसभेचा ठराव आवश्यक असून गावातील इलेक्ट्रिक शाखेत आयटीआय झालेला बेरोजगार युवकाला रोजगार मिळू शकेल. यासंदर्भात येत्या 15 ऑगस्ट रोजी सर्व ग्रामसभेने हा विषय प्राधान्याने घेण्याबाबत मुख्य कार्यकारी अधिका-यांनी गावांना सुचना कराव्यात.

यापूर्वीच जिल्हा नियोजन समितीतून ट्रान्सफार्मरसाठी 25 कोटी रुपये अतिरिक्त देण्यात आले आहे. त्यामुळे सिझनमध्ये ट्रान्सफार्मरबाबत एकही तक्रार येऊ देऊ नका. महाराष्ट्र ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानातील सर्व गावांमध्ये व्यायामशाळा द्या, अशा सुचना पालकमंत्र्यांनी केल्या. तसेच आदिवासी उपयोजना समितीचा आढावा घेतांना ते म्हणाले, आदिवासींच्या वैयक्तिक लाभांच्या योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहचविणे आवश्यक आहे. पारधी, कोलाम, गोंड, कातकरी या समाजाला मुख्य प्रवाहात आणायचे आहे. त्यामुळे त्यांना आदिवासी योजनांचा लाभ मिळाला पाहिजे. त्यांना घरकुलचा लाभ द्यावा. तसेच सर्व आदिवासी आश्रमशाळा, वसतीगृहे येथे रुफटॉपचे नियोजन करावे. जिल्ह्यातील अजूनही काही कोलाम पोड रस्त्यांविना आहे. त्यामुळे ते गावाच्या दूर वसाहत करून राहतात. त्यांच्या पोडापर्यंत रस्त्यांचे नियोजन करा. रोजगार, रस्ता आणि वीज पोडांवर पोहचविण्यासाठी प्रकल्प कार्यालयाने गांभिर्याने लक्ष द्यावे, असे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले.

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक उईके म्हणाले, चंदीपुरा येथे वेगळ्या प्रकारच्या माशीची लागण नागरिकाला झाली आहे. याकडे आरोग्य विभागाने लक्ष द्यावे. तसेच घारफळ आणि परिसरातील गावांत नेहमीच विज पुरवठा खंडीत असतो. हा विज पुरवठा नियमित करून विद्युत विभागाने नागरिकांना दिलासा द्यावा, अशा सुचना त्यांनी केल्या.यावेळी गत नियोजन समितीच्या बैठकीच्या इतिवृत्तास मान्यता देणे, इतिवृत्तावरील अनुपालन अहवालास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2018-19 अंतर्गत सर्वसाधारण योजना व अनुसूचित जाती उपयोजना पुनर्विनियोजन प्रस्तावास कार्योत्तर मान्यता देणे व त्याअंतर्गत झालेल्या खर्चास मान्यता देणे, जिल्हा वार्षिक योजना सन 2019-20 अंतर्गत अर्थसंकल्पीत निधी, 20 जुलै अखेर खर्चाचा आढावा व वेळेवरच्या विषयांवर चर्चा करण्यात आली.बैठकीला जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध विभागांचे विभाग प्रमुख उपस्थित होते.