शासनाच्या ‘फ्लॅग’शिप योजनांमध्ये जिल्हा राज्यात अग्रस्थानी ठेवावा- डॉ. संजय कुटे

0
8
  • विविध शासकीय योजनांचा आढावा
  • प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतील गोल्डन कार्ड वितरणाचे प्रमाण वाढवावे
  • ’ वर्ग नगर परिषदांमध्ये मनरेगाची कामे देण्यात यावी
  • कर्जमाफीच्या लाभार्थ्यांच्या पात्र-अपात्र याद्या सहायक निबंधक कार्यालयात लावाव्यात

बुलडाणा,दि.4 : राज्य शासन विविध योजनांमधून राज्याचा सर्वांगिण विकास साधण्याचा प्रयत्न करीत आहे. नागरिकांच्या कल्याणासोबतच त्यांचे भविष्य सुरक्षित,सुंदर करण्यासाठी शासन काम करीत आहे. शासनाच्या विविध फ्लॅगशिप योजना विहित कालमर्यादेत उद्दिष्टपूर्ती करण्यासाठी कार्यान्वीत आहेत. या सर्व फ्लॅगशिप योजनांमध्ये जिल्हा हा राज्यात अग्रस्थानी ठेवावा. त्यासाठी यंत्रणांनी समन्वयाने काम करीत जिल्ह्याला पुढे ठेवावे, असे निर्देश पालकमंत्री डॉ. संजय कुटे यांनी  दिले.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज विविध योजनांच्या  आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर जि.प अध्यक्षा सौ. उमाताई शिवचंद्र तायडे, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षण्मुगराजन, प्र. जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे, निवासी उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. दिलीप पाटील- भुजबळ आदी उपस्थित होते.

प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेतंर्गत पात्र लाभार्थ्यांना गोल्डन कार्ड वितरणाचे प्रमाण वाढविण्याचे सूचीत करीत पालकमंत्री डॉ. कुटे म्हणाले, गोल्डन कार्ड वितरणासाठी गावनिहाय कॅम्प घ्यावेत. आशा कार्यकर्ता यांना लाभार्थ्यांपर्यंत पोहचवून कार्ड काढण्यासाठी प्रेरीत करावे. तसेच यापूर्वी केंद्र शासनाचे प्रमाणपत्र दिलेल्या लाभार्थ्यांच्या घरपोच आशा कार्यकर्ता यांनी जावून त्यांना गोल्डन कार्ड काढण्याची कार्यवाही करावी.  प्रधानमंत्री आवास योजेनतंर्गत नागरी क्षेत्रात घरकूले मंजूर करावी. सन 2022 च्या उद्दिष्टानुसार घरकुले पूर्ण करावीत. नगर परिषदांनी डिपीआर तयार केले नसल्यास त्वरित डिपीआर तयार करण्याची कार्यवाही करावी. पात्र व्यक्तीला घरकुल मिळाले पाहिजे. ग्रामीण भागात अडचणी असल्यास अडचणींची सोडवणूक करून घरकुलांचे काम पूर्ण करावे.

बांधकाम कामगारांना घरकुले देण्यात येणार आहे. कामगार विभागाकडून निधी देवून बांधकाम कामगारांना घरकुलांचा लाभ देण्यात यावा. त्यासाठी कामगार विभागाने पात्र बांधकाम कामगारांच्या याद्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेकडे सादर कराव्यात. घरकुलांसाठी बरीच कंत्राटी पद्धतीवर कर्मचारी नेमण्यात आलेले आहे. या कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कामाची तपासणी करण्यात यावी. तक्रारी आलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांना ताकीद द्यावी. या बाबीकडे गटविकास अधिकारी यांनी लक्ष द्यावे. तसेच शौचालय बांधकामाच्या अनुदानाचा पहिला हप्ता घेवून काम न केलेल्या लाभार्थ्यांना बांधकाम करण्यासाठी सूचीत करावे. प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेतंर्गत पात्र लाभार्थी शेतकऱ्यांच्या याद्या 100 टक्के केंद्र शासनाच्या पोर्टलवर अपलोड कराव्यात. जेणेकरून शेतकऱ्यांना किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळेल. अपात्र असल्यास लाभार्थ्याला कारणासह कळवावे, असेही त्यांनी सांगितले.

‘क’ वर्ग नगरपालिका क्षेत्रांमध्ये महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची कामे देण्याच्या सूचना देत पालकमंत्री डॉ. कुटे म्हणाले, या नगरपालिका क्षेत्रातील मजूरांना काम मिळवून द्यावे. त्यांना जॉबकार्ड देण्यात यावे.  त्यामुळे त्यांच्या हाताला काम मिळेल. पालकमंत्री पांदण रस्ते योजनेमध्ये प्राधान्यक्रम ठरवून कामे मंजूर करावी. तहसिलदार यांनी आपल्या तालुक्यातील कामांची निकड लक्षात घेवून प्राधान्यक्रम ठरवावा. मुद्रा योजनेतून कर्ज देण्यात आलेल्या लाभार्थ्यांची यादी राष्ट्रीयकृत बँकांनी उपलब्ध करून द्यावी. जेणेकरून लाभार्थ्यांची माहिती मिळेल. प्रधानमंत्री पिक विमा योजनेच्या लाभासाठी कंपन्यांनी त्यांचा प्रतिनिधी तालुका कृषि अधिकारी कार्यालयात बसवावा. तसेच विमा कंपनीशी संबधित तक्रारींचा तातडीने निपटारा करावा. कृषि विभागाने किड व्यवस्थापन, शेतकऱ्यांना किड नियंत्रणाचे मार्गदर्शन करणे, फवारणीसंबधी मार्गदर्शन करणे आदी कामांसाठी कृषि महाविद्यालयांतील कर्मचाऱ्यांचा उपयोग करावा. त्यांच्या प्राध्यापकांना यामध्ये सामावून घ्यावे. शेतकऱ्यांच्या बांधावर कृषि महाविद्यालयातील विषयतज्ज्ञ, प्राध्यापक यांना नेत शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. छत्रपती शिवाजी महाराज कृषि सन्मान योजनेतंर्गत कर्जमाफी मिळालेल्या लाभार्थ्यांच्या याद्या सहायक निबंधक कार्यालयाला पाठविण्यात याव्यात. या योजनेत पात्र व अपात्र अशा दोन्ही याद्या तहसिल कार्यालय,सहायक निबंधक कार्यालय व संबधित बँकेची शाखा यामध्ये प्रकाशित करण्यात याव्यात. अपात्र लाभार्थ्यांच्या याद्या पुर्नतपासणी करून संबंधित तहसिलदारांकडे देण्यात याव्यात. सहायक निबंधक यांच्या समितीने प्रत्येक सोमवार व गुरूवार रोजी सहायक निबंधक कार्यालयात सकाळी 11 ते सायं 5 वाजेदरम्यान एक महिन्यासाठी बैठक घ्यावी. यामध्ये कर्जमाफीच्या पात्र, अपात्र याद्यांबाबत तसेच तक्रारींबाबत कार्यवाही करावी. या बैठकीला संबंधित तहसिलदा यांनी भेट द्यावी.

याप्रसंगी मुख्यमंत्री ग्रामसडक योजना, जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, राष्ट्रीय ग्रामीण पेयजल कार्यक्रम, खरीप दुष्काळ निधी वितरण, पिक कर्ज वितरण आदी विषयांचा आढावा घेण्यात आला. यावेळी प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेच्या लाभार्थ्यांना गोल्डन कार्डचे यावेळी वितरण करण्यात आले.  बैठकीला संबंधित यंत्रणांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.