भंडारा,दि.25ः-भंडारा येथील १00 खाटांचे महिला रुग्णालय ६१ कोटी खर्च करुन निर्माण करण्यात येणार आहे. या ठिकाणी आरोग्याच्या अत्याधुनिक सेवा उपलब्ध राहणार आहेत. इमारत संपूर्ण हरित व सौर उर्जेवर केली जाईल. रेन वॉटर हार्वेस्टींग व वायफाय हे वैशिष्ट राहणार असून २ टप्प्यात इमारतीचे बांधकाम पूर्ण होणार आहे. येत्या २ वर्षात ही इमारत लोकांच्या सेवेत रुजू होणार असून भंडारावासीयांना उपचारासाठी नागपूर येथे जाण्याची गरज भासणार नाही. भंडारा शहरातच अत्याधुनिक आरोग्य सेवा उपलब्ध होतील, अशी ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.
भंडारा येथील १00 खाटांचे महिला रूग्णालय ईमारत बांधकामाचे भूमिपूजन शनिवारी सामान्य रूग्णालय भंडारा येथे पालकमंत्री डॉ.परिणय फुके यांच्या हस्ते झाले. खासदार सुनील मेंढे, आ. रामचंद्र अवसरे, आ. राजेश काशीवार, मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र जगताप, उपवन संरक्षक विवेक होशिंग, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.प्रमोद खंडाते, कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम दिनेश नंदनवार व जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन चव्हाण प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
भंडारा-गोंदिया जिल्ह्याचा खरा विकास केला जाणार असून नवेगाव-नागझिरा पर्यटन विकासासाठी कटिबध्द आहोत. पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी होमस्टे योजना आखली असून यासाठी एका कंपनीशी करार करण्यात आला आहे. तुमसर येथे स्टिल प्लांट उभारण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. वैनगंगेमध्ये इकोर्निया निर्मूलनासाठी २ कोटींची तरतूद केली आहे. उमरेड-कर्हांडला-पवनी या व्याघ्र प्रकल्पाच्या विकासासाठी २00 कोटीची योजना तयार केल्याचे त्यांनी सांगितले. आशा वर्कर यांच्या समस्या सोडविण्यासाठी कटिबध्द असून या विषयावर मुख्यमंत्र्यांना भेटणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आशा वर्कर सक्षम झाल्याशिवाय रुग्ण सेवा घराघरात पोहचणार नाही, असे सांगून आयुष्मान भारत योजनेतील सर्व पाच लाख लाभार्थ्यांना ई-कार्ड वाटप तात्काळ करावे, असे खासदार सुनील मेंढे म्हणाले. नेत्रदान आणि अंधत्व निवारणात जिल्हा राज्यात पहिला असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रमोद खंडाते यांनी प्रास्ताविकात सांगितले. या कार्यक्रमास डॉक्टर व नागरिक उपस्थित होते.





