शिवसैनिकांकडून पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन

0
18

गोरेगाव,दि.30- अखिल भारतीय किसान खेतमजूर आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष व महाराष्ट्र प्रचार समितीचे प्रमुख माजी खासदार नाना पटोले यांनी राज्यपरिवहन महामंडळाच्या तिकीटातील एक रुपया हा मातोश्रीवर जात असल्याचा  केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ गोरेगाव येथील शिवसैनिकांनी पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन करीत निषेध नोंदविला.तसेच गोरेगाव येथील पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यासाठी निवेदन सादर केले. पटोले यांनी एस.टी.महामंडळाच्या तिकिटातून अपघात विम्याच्या नावावर घेतले जाणारे पैसे मातोश्रीवर जातात असा आरोप नाना पटोलेंनी केला होता. या वक्तव्याच्या निषेधार्थ गोरेगाव येथे शिवसैनिकांनी मोर्चा काढत पटोलेंच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले. विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने राज्यात सर्वच पक्षांच्या यात्रा निघाल्या आहेत. यातच काँग्रेसचे राज्य प्रचारप्रमुख नाना पटोले यांनी महापर्दापाश यात्रेत अमरावतीच्या सभेत प्रवासी विमा प्रकरणी शिवसेना विरोधी वक्तव्य केले होते. त्याचे पडसाद गोंदिया जिल्ह्यात उमटले.अपमानास्पद आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याचा निषेध व्यक्त करण्यासाठी गोरेगाव येथे शिवसैनिकांनी पटोले यांच्या विरोधात मोर्चा काढला. यावेळी त्यांच्या प्रतीकात्मक पुतळ्याचे आणि फोटोचे दहन करण्यात आले. तसेच निषेधात्मक घोषणा देण्यात आल्या.