वाशिम, दि. ०५ – सार्वजनिक न्यासाव्यतिरिक्त गणेश मंडळांनी महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम, १९५० च्या कलम ४१-सी अन्वये विहित नमुन्यात संकेतस्थळावर किंवा प्रत्यक्षरित्या संबंधित सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालयात अर्ज करणे आवश्यक आहे. गणेश मंडळांना, मंडळ नोंदणी अर्ज charity.maharashtra.gov.in या संकेत स्थळावर करता येतील.
संकेतस्थळावर सादर करण्यात आलेल्या अर्जांचा निपटारा महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्थ व्यवस्था अधिनियमातील कलम ४१-सी उपकलम-२ अन्वये ७ दिवसाच्या आत निकाली काढण्यात येईल. प्रत्यक्ष सादर केलेले अर्ज प्राप्त झाल्यापासून १५ दिवसांच्या आत निकाली काढण्यात येईल. सदर तरतुदीअंतर्गत देण्यात येणारे दाखले ६ महिन्यांकरीता वैध असतील. या कालावधीनंतर असे दाखले नुतनीकरण करण्यास ग्राह्य नसतील. सर्व गणेशोत्सव मंडळांना सदरचा दाखला प्राप्त झाल्यापासून त्या कालावधीनंतर २ महिन्यांच्या आत कार्यालयात लेखा परिक्षण अहवाल सादर करणे व उर्वरित रक्कम जमा करणे अनिवार्य आहे.
गणेशोत्सव मंडळाने वरील तरतुदीप्रमाणे परवानगी न घेतल्यास महाराष्ट्र सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था अधिनियम १९५० चे कलम ६६-सी प्रमाणे ३ महिन्यांपर्यंत कैद किंवा परवानगी प्राप्त करण्यापुर्वी गोळा केलेल्या एकूण वर्गणीच्या दीड पटपर्यंत दंडाची तरतूद केली आहे. तरी सर्व मंडळांना भविष्यात होणारा अनर्थ टाळणेसाठी १९५० चे कलम ४१-सी या तरतुदीचे काटेकारपणे पालन करावे. असे आवाहन संजय मेहरे, धर्मदाय आयुक्त, महाराष्ट्र राज्य , मुंबई यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.




