स्व. अटलबिहारी वाजपेयी सभागृहाचे लोकार्पण
गोंदिया दि.6 : देशासाठी आपल्या प्राणांचे बलिदान करणाऱ्या आणि देशाच्या सीमांचे रक्षण करणाऱ्या सैनिकांबाबत आपल्याला गर्व आहे.त्यांच्यामुळेच आज आपण सुखाने जीवन जगत आहे. सैनिक सेवेतून जे निवृत्त झाले, ज्यांना वीरमरण आले अशा सैनिकांच्या कुटूंबांना अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. जिल्हयातील माजी सैनिक व शहीद जवानांच्या कुटूंबियांच्या समस्या आपण तातडीने सोडविणार असल्याची ग्वाही पालकमंत्री डॉ. परिणय फुके यांनी दिली.
5 सप्टेंबर रोजी तिरोडा येथे नगर परिषदेच्या वैशिष्टयपूर्ण योजनेअंतर्गत बांधण्यात आलेल्या भारतरत्न अटलबिहारी वाजपेयी बहूउद्देशीय सभागृहाचे लोकार्पण पालकमंत्री डॉ. फुके यांनी
केले. यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात शहीद वीरपत्नी, आजी माजी सैनिकांच्या सत्कारप्रसंगी डॉ. फुके बोलत होते. अध्यक्षस्थानी खा. सुनील मेंढे होते. प्रमुख अतिथी म्हणून आमदार विजय रहांगडाले, माजी आमदार हेमंत पटले, बांधकाम समिती सभापती विजय बन्सोड, महिला व बालकल्याण समिती सभापती राखी गुनेरीया, अशोक असाटी, सैनिक संघटनेचे अध्यक्ष राजाराम पटले यांचेसह अन्य पदाधिकारी यांची उपस्थिती होती.डॉ. फुके म्हणाले, माजी सैनिकांच्या परिवाराच्या विविध कार्यक्रमासाठी हे सभागृह मोफत देण्यात येईल.
खा. मेंढे म्हणाले, केंद्र सरकारने भारतीय सैन्याचा विचार करुन त्यांच्या हितासाठी वन रँक वन पेन्शन ही योजना लागू केली आहे. भारतीय भूमीच्या रक्षणार्थ आपल्या कामाचे बलिदान देणाऱ्या
सैनिकांचे पार्थिव सन्मानपूर्वक त्यांच्या घरी पोहोचविले जाते. सैनिकांच्या परिवारांना अडचणीचा सामना करण्याची वेळ येऊ नये यासाठी केंद्र सरकारने पाऊले उचलली असल्याचे त्यांनी सांगितले.
आमदार रहांगडाले म्हणाले, वीरमातांनी देशाच्या सेवेसाठी आपल्या पुत्रांची आहूती दिली. त्यांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या सभागृहाच्या
निर्मितीमुळे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याची सुविधा तिरोडा येथे उपलब्ध झाली आहे. या इमारतीची देखभाल व वापर नगरपरिषदेने चांगल्याप्रकारे व जबाबदारीने करावा. इमारतीच्या बांधकामावर साडेचार कोटीपेक्षा जास्त खर्च करण्यात आला असून नगर परिषदेच्या उत्पन्नात या सभागृहामुळे वाढ होण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले. यावेळी माजी आमदार हेमंत पटले
यांनीही समायोचित भाषण केले.
मान्यवरांच्या हस्ते वेणूबाई शेंडे,रत्नाबाई बिसेन, किरण कटरे, हंसाबाई बडवाईक, दुर्गाबाई पटले, आशा पटले,शोभा कापसे, अंजिरा नागदेवे, कुसुम शेंदरे, पुष्पाकिरण पारधी, राधा पटले
यांच्यासह अन्य वीरमाता व वीरपत्नी तसेच माजी सैनिक टेकचंद लांजेवार,श्रावण भेलावे, भिवाजी कटरे, बागुलाल आगासे, हंसराज ऊईके, हरेंद्र चौधरी,युवराज टेंभरे, गजानन बोपचे, अशोक टेंभरे, सोमाजी मेश्राम, नरेंद्र तराटे, सुरज पारधी यांचेसह अन्य माजी सैनिकांचा शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह देवून सत्कार करण्यात आला तसेच यावेळी ऐरोबिक्समध्ये यश संपादन करणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सन्मानित करण्यात आले. कार्यक्रमाला नगरपालिकेच्या विविध समित्यांचे सभापती, नगरसेवक, प्रतिष्ठित नागरिक, माजी सैनिक, वीरमाता, वीरपत्नी व त्यांचे कुटूंबिय
मोठया संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व उपस्थितांचे आभार मदन पटले यांनी मानले.





