30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ गंगाबाईतील शस्त्रक्रीया कक्ष दुषीत

गंगाबाईतील शस्त्रक्रीया कक्ष दुषीत

0
44
अहवालावरून सिझेरिअनचे रुग्ण नागपूरला रेफर
गोंदिया,दि.18 : गरिबांकरिता माहेरचे प्रसूतीघर म्हणून गोंदिया जिल्हा मुख्यालयात असलेलेल्या बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयाची ओळख आहे. या रुग्णालयात गोंदिया, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यांसह छत्तीसगड आणि मध्यप्रदेशातील सिमावर्ती भागातून महिला मोठ्या प्रमाणात प्रसूतीकरिता येतात. बाई गंगाबाई हे रुग्णालय सुमारे १०० वर्षे जुने आहे. या रुग्णालयातील उपलब्ध खाटांची संख्या २०० असली तरी या रुग्णालयावरील असलेला विश्वास आणि गरिबांकरिता या रुग्णालयाऐवजी दुसरे शासकीय महिला रुग्णालय उपलब्ध नसल्यामुळे या रुग्णालयात उपलब्ध खाटांपेक्षा जास्त महिला येथे येतात. त्यामुळे त्या महिलांची व्यवस्था करण्यातच प्रशासनाची तारांबळ उडते. मात्र आहे त्या संसाधनावर देखील महिलांची प्रसूती करण्यावर येथील अधिकाऱ्यांचा भर असतो. गेल्या दोन वर्षांपूर्वी या रुग्णालयाचे हस्तांतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाला करण्यात आले. वैद्यकीय महाविद्यालयाला रुग्णालय गेल्यानंतर येथील सोयी-सुविधांत वाढ होणे गरजेचे होते. परंतु, झाले उलटच. आधी असलेल्या सुविधा देखील आता कालबाह्य होत चालले असल्याचा प्रकार सुरू आहे. बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीकरिता असलेले कक्ष दुषीत असल्याचा अहवाल खुद्द शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रो बायोलॉजी विभागाने दिला. त्यामुळे सिझेरिअन आणि इतर शस्त्रक्रीया झाल्यास रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण होण्याची शक्यता असल्यामुळे तातडीने शस्त्रक्रीया बंद करण्यात याव्या, असा अहवाल देण्यात आल्यामुळे (दि. १७) रुग्णालयातील शस्त्रक्रीया तातडीने बंद करण्यात आल्या आहेत. याचा फटका मात्र येथे प्रसूतीकरिता येणाऱ्या महिला आणि त्यांच्या कुटुंबियांना सहन करावा लागत आहे.
दमट वातावरणाचा फटका
गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. सूर्य दर्शन देत नाही. त्यामुळे वातावरणात ओलावा आहे. परिणामी बाई गंगाबाई रुग्णालयातील शस्त्रक्रीया कक्षाला त्याचा फटका बसला. या वातावरणामुळे कक्षातील वातावरण परिक्षणात दुषीत असल्याचे आढळून आले.
दिवसाला २२ सिझेरिअन
बाई गंगाबाई रुग्णालयात प्रसूतीकरिता येणाऱ्या मातांची संख्या मोठी आहे. दिवसाकाठी एकट्या सिझेरिअनच्या सरासरी २२ शस्त्रक्रीया करण्यात येतात. येथील शस्त्रक्रीया बंद झाल्यामुळे एवढ्या मोठ्या संख्येत मातांना नागपूरला शस्त्रक्रीयेकरिता पाठविणे म्हणजे वैद्यकीय महाविद्यालय प्रशासनाला तारेवरची कसरतच करावी लागणार आहे.
आठ दिवस राहणार बंद
शस्त्रक्रीया कक्ष दुषीत असल्याने त्याची दुरुस्ती आणि उपाययोजना करण्याकरिता किमान आठ दिवसांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. या काळात दुरुस्तीच्या उपाययोजना करणे, त्याचे पुन्हा परिक्षण करणे आणि त्यानंतर अहवालाची प्रतिक्षा हा मोठा काळ असणार आहे. रात्रंदिवस प्रसूतीचा भार असणाऱ्या या रुग्णालयात हा प्रसंग घडल्यामुळे रुग्णांना कमालीचा त्रास सहन करावा लागणार आहे.
माता-बालकांच्या जीवासाठी निर्णय
शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या मायक्रो बायोलॉजी विभागाने दिलेल्या अहवालात शस्त्रक्रीया कक्ष दुषीत आढळून आला आहे. हवामानाच्या बदलामुळे हा प्रकार घडला. माता आणि बालकांच्या जीवाला धोका निर्माण होवू नये उद्देशाने शस्त्रक्रीया बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. रुग्णांची हेळसांड होवू नये याकरिता वैद्यकीय महाविद्यालयाचे विभागप्रमुख, अधिष्ठाता यांच्याशी चर्चा करून मातांना सिझेरिअनकरिता नागपूर येथे हलविण्यात येत आहे. त्याकरिता मोफत रुग्णवाहिका उपलब्ध करून देण्यात येत आहे.
डॉ. सुवर्णा हुबेकर
प्रभारी अधीक्षक, गंगाबाई रुग्णालय