30.6 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ युवकांनी लेखनीतून समाज परिवर्तन घडवावे : यशवंत सरुळकर

युवकांनी लेखनीतून समाज परिवर्तन घडवावे : यशवंत सरुळकर

0
26

– हिंदी दिनानिमित्त स्वरचित काव्य स्पर्धेचे आयोजन
– दिग्वीजय दिवस व स्व.मनोरमा धोटे यांची जयंती साजरी
– साहित्यकार गेडाम, शर्मा व तिवारी यांचा सत्कार
गोंदिया,दि.18ः- आजची युवा पीढी ही फक्त मोबाईलमध्ये किंवा चार भींतीच्या आड दडलेली आहे, असे आपण नेहमीच टिकात्मक बोलतो. मात्र, त्यांच्यात असलेल्या प्रतिभेला ओळखून संधी देत नाही. युवकांच्या विचाराच्या शक्तीतूनच जगात क्रांती व परिवर्तन घडले आहे. त्यांचे विचार, अभिव्यक्ती हे लेखनीच्या माध्यमातून समाजाला दिशा देण्याचे कार्य करत आहे, याची प्रचिती स्वरचित काव्य स्पर्धेत जाणवल्याचे प्रतिपादन विदर्भ साहित्य संघाचे अध्यक्ष यशवंत सरुळकर यांनी अध्यक्षीय भाषणातून केले.
ते १६ सप्टेंबर रोजी भवभूती रंगमंदिरात विदर्भ साहित्य संघातर्फे आयोजित हिंदीदिनानिमित्त स्वरचित काव्य स्पर्धा, दिग्वीजय दिवस व स्व. मनोरमा धोटे जयंती कार्यक्रमात बोलत होते. यावेळी प्रामुख्याने माणिक गेडाम, रमेश शर्मा, शशी तिवारी, विजया चौधरी, धर्मिष्ठा सेंगर, शिला धोटे, नीला धोटे, भारती धोटे, विभा धोटे, प्रदिप व्यवहारे, कार्यक्रम संयोजक किंजल मेहता, दीपक वेरुळकर, राजश्री धामोरीकर, भैरवी देशपांडे, गौरव धोटे, स्वाती पिंपळापुरे, जयंत शुक्ला, मोहन देशपांडे, संजीव बापट, नितीन गोखले, तेजस्विनी धोटे, अरविंद बर्डे, मेघा व्यवहारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात स्वामी विवेकानंद, माजी आ. स्व. मनोरमा धोटे यांच्या तैलचित्राला माल्यर्पण व व्दिपप्रज्वलनाने करण्यात आली. याप्रसंगी शीला धोटे व डॉ. राजश्री धामोरीकर यांनी मनोरमा धोटे यांच्या जीवनावर प्रकाश टाकत त्यांच्या कार्याची माहिती दिली. १५ वर्ष त्या विदर्भ साहित्य संघाच्या अध्यक्ष होत्या. यादरम्यान जिल्ह्यात नाट्यचळवळीला त्यांनी वेगळी ओळख निर्माण करुन दिली. गौरव धोटे यांनी यावेळी जिल्ह्यात लोप पावत असलेली नाट्यचळवळ पुन्हा सुरु करुन कलावंताना मंच उपलब्ध करु हीच आजीला श्रध्दांजली असणार असल्याचे सांगितले. दिग्वीजय दिनानिमित्त स्वामी विवेकानंद यांच्या शिकागो येथील भाषण व त्यासंदर्भाची माहिती स्वामी रामकृष्ण सत्संग मंडळाच्या विजया चौधरी यांनी दिली. हिंदी दिनानिमित्त साहित्यकार रमेश शर्मा यांनी, हिंदी भाषेचा व्याकरण व अलंकाराचा महिमा सांगत देशात आजघडीला झालेली अवस्था तसेच राष्ट्रभाषा व राजभाषा यासंदर्भात माहित देऊन हिंदीचा प्रचार, प्रसार करण्याचे आवाहन केले. यानिमित्त महाविद्यालयीन स्तरावर स्वरचित काव्यस्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. यात नवोदित कवी-कवियत्रींनी आपल्या रचनेतून उपस्थितांची मने जिंकली. स्पर्धेत प्रथम क्रमांक नमाद महाविद्यालयाची लक्ष्मी मुनेश्वर लिखीत ‘न जाने क्यू’ या रचनेला मिळाला. व्दितीय एमआयईटीची पुजा खोब्रागडे रचीत ‘अभी उमर नही’, तृतीय धोटे बंधू महाविद्यालयाची हीतेश्वरी पटले रचीत ‘वो पाच दिन’ या कवितेला देण्यात आला. तर प्रोत्साहन पुरस्कार नमाद महाविद्यालयाचा अजय चौधरी रचीत ‘विश्वास’, धोटे बंधू महाविद्यालयाचा उज्वल मेश्राम रचित ‘ध्येय’ व खूशबू तिवारी रचित ‘मैने देखा है’ या कवितेला देण्यात आला. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेचे परीक्षक म्हणून राष्ट्रभाषा प्रचार समिती वर्धाच्या सदस्या धर्मिष्ठा सेंगर व किंजल मेहता यांनी काम पाहिले. याप्रसंगी प्रसिध्द साहित्यकार रमेश शर्मा, माणिक गेडाम व शशी तिवारी यांचा विदर्भ साहित्य संघातर्फे शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक संयोजक किंजल मेहता यांनी सादर करून स्व. माधव रमेश कोतवाल यांना हा कार्यक्रम समर्पित असल्याचे सांगितले. संचालन जयंत शुक्ला यांनी केले तर आभार सचिव प्रदिप व्यवहारे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी विदर्भ साहित्य संघाच्या सदस्यांनी परिश्रम घेतले.