सर्व विभाग प्रमुख, नोडल अधिकारी व राजकीय पक्षांची बैठक
गोंदिया: दि 24 भारत निवडणुक आयोगाने 21 सप्टेंबर 2019 पासून विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आदर्श आचार संहिता लागू केली आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासकीय यंत्रणा कामाला लागली आहे. जिल्हाधिकारी डॉ. कादंबरी बलकवडे यांच्या अध्यक्षतेखाली आदर्श आचार संहितेची काटेकोरपणे अमलबजावणी करुन निवडणुकीदरम्यान इको फ्रेंडली प्रचार साहित्याचा वापर करण्यासाठी तसेच निवडणुक कालावधीत भारत निवडणुक आयोगाने दिलेल्या सुचनेचे पालन करण्यासाठी मान्यताप्राप्त सर्व राजकीय पक्ष,सर्व विभाग प्रमुख व नोडल अधिकारी यांची महत्वाची बैठक 23 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह येथे संपन्न झाली.
या बैठकीत जिल्हाधिकारी डॉ बलकवडे यांनी उपस्थित राजकीय पक्षांना या निवडणुकीत प्लास्टीक/पॉलीथीनचा वापर न करता पर्यावरण स्वच्छता व संवर्धनासाठी सर्व राजकीय पक्षांना इको फ्रेंडली प्रचार साहित्य वापरण्याचे आवाहन केले आहे. त्यांनी सांगितले की निवडणुकीदरम्यान राजकीय पक्ष तसेच उम्मेदवारांना संवैधानिक कर्तव्य व आदर्श आचार संहितेचे पालन करणे बंधनकारक आहे. तसेच उमेदवारांनी त्यांच्यावर दाखल फौजदारी गुन्हयाबाबतची माहिती विहीत नमुन्यात तीन वेळेस वर्तमानपत्रात, इलेक्ट्रानीक मिडीयामध्ये दिनांक 8 ऑक्टोबर 2019 ते 19 ऑक्टोबर 2019 या दरम्यान देणे बंधनकारक आहे. निवडणुक प्रचारासाठी शासकीय वाहनाचा वापर करता येणार नाही . शेवटचे 48 तासात उमेदवारांना कोणत्याही सोशल मिडीयाचा वापर करता येणार नसल्याची माहिती डॉ.बलकवडे यांनी यावेळी दिली.
त्या पुढे म्हणाल्या की, विधानसभा निवडणूकीत प्रशासनाच्या माध्यमातुन मतदारांमध्ये जनजागृती करुन मतदानाची टक्केवारी वाढविण्याची विशेष मोहिम चालविण्यात येत आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट संबंधी काही गैरसमज असल्यास त्याचे समाधान करण्यासाठी प्रत्यक्ष या मोहिमेत सर्वसामान्य लोकांना सहभागी करणे आवश्यक आहे. ईव्हीएम तथा व्हीव्हीपॅटविषयी माहिती व जनजागृती लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी राजकीय पक्षांचे सहकार्य आवश्यक आहे. सदर बैठकीत विविधि राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींनी उपस्थित केलेल्या विषयांवर जिल्हाधिकारी यांनी योग्य मार्गदर्शन करुन शंकांचे निराकरण केले.
जिल्हाधिकारी यांनी सर्व विभाग प्रमुख व नोडल अधिकारी यांना आदर्श आचार संहितेच्या 72 तासात त्यांच्या विभागात सुरु असलेल्या कामांची यादी सादर करण्याचे निर्देश दिले. तसेच मतदानाची टक्केवारी वाढविण्याकरिता शाळा, महाविद्यालय, नागरीकांमध्ये जास्तीत जास्त जनजागृती करण्याचे निर्देश दिले. या वेळेस प्रामुख्याने उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुभाष चौधरी, जिल्हा समन्वय अधिकारी (निवडणुक खर्च) विकास राऊळकर, नायब तहसिलदार आर.एस पटले तसेच मान्यताप्राप्त राजकिय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.
निवडणुक आदर्श आचार संहिता लागल्यावर पोस्टर, फलक, बॅनर, होर्डीग्सवर करण्यात आलेल्या कार्यवाही
1.शासकीय कार्यालय (24 तास) – 1030
2.सार्वजनिक ठिकाण (48 तास) – 1825
3.खाजगी/व्यक्तिगत ठिकाण (72 तास) कार्यवाही सुरु आहे – 647
4.कार्यालयीन वेबसाईट वरुन सर्व राजकीय व्यक्तींचे छायाचित्र/फोटो व माहिती काढण्यात आली आहे.
अ. काढण्यात आलेले बॅनर – 787
ब. काढण्यात आलेले होर्डीग्स – 708
क. काढण्यात आलेले कटआऊट कमानी- 166
ड. काढण्यात आलेले झेंडे – 1841
एकुण – 3502 इतके




