27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ शाळा, महाविद्यालयांमध्ये होणार लोकशाहीचा जागर;मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उपक्रम

शाळा, महाविद्यालयांमध्ये होणार लोकशाहीचा जागर;मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उपक्रम

0
78

वाशिमदि. २५ :  निवडणूक म्हणजे लोकशाहीचा उत्सव. या उत्सवात जास्तीत जास्त मतदारांनी सहभागी व्हावे, याकरिता शाळा, महाविद्यालयांमध्ये विशेष जनजागृती मोहीम राबविण्यात येणार आहे. याबाबत सर्व मुख्याध्यापक व प्राचार्यांना सूचना देण्यात आल्या असून आज, २६ सप्टेंबर पासून शालेय परिपाठामध्ये विद्यार्थ्यांना मतदान व लोकशाही विषयी माहिती देवून या उपक्रमाची सुरवात होणार आहे.

३० सप्टेंबर रोजी सर्व शाळा, महाविद्यालयांमध्ये वयोगटानुसार चित्रकला, रांगोळी स्पर्धा व मतदार जागृतीविषयक घोषवाक्य स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. त्यानंतर ५ ऑक्टोंबर रोजी सकाळी प्रभातफेरीचे आयोजन करून मतदार जागृती केली जाणार आहे. ७ ऑक्टोंबर रोजी सर्व शाळा व महाविद्यालयात निबंध स्पर्धांचे आयोजन केले जाणार आहे. ९ ऑक्टोंबर रोजी सर्व विद्यार्थी आपल्या पालकांना पत्र लिहून मतदानाचे महत्व पटवून देणार आहेत, तसेच या पत्राद्वारे आपल्या पालकांना व घरातील सर्व मतदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत मतदान करण्याचे आवाहन करणार आहेत.

लोकशाही आणि निवडणूक, मतदानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी ११ ऑक्टोंबर रोजी वक्तृत्व व परिसंवाद स्पर्धेचे आयोजन केले जाणार आहे. मतदान, लोकशाही बळकटीकरण आदी विषयवार ३० सप्टेंबर ते १८ ऑक्टोंबर या कालावधीत आठवडी बाजाराची ठिकाणे, गर्दीची ठिकाणे, चौक येथे पथनाट्य सादर करून मतदार जागृती केली जाणार आहे. यामध्ये कनिष्ठ महाविद्यालय व महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. १७ ऑक्टोंबर रोजी शाळांमध्ये अभिरूप मतदान प्रक्रिया राबविण्यात येणार आहे.

मतदार जागृतीसाठी प्रत्येक शाळा, महाविद्यालयाने नाविन्यपूर्ण कार्यक्रम राबवून मतदार जागृतीच्या कार्यात सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक व जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी तथा स्वीप समितीचे नोडल अधिकारी दीपक कुमार मीना यांनी केले आहे.