गडचिरोली, दि.२८: जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी आज अहेरी विधानसभा क्षेत्रात विधानसभा निवडणूकाच्या अनुषंगाने कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले. आजच्या प्रशिक्षणाला एकूण ४४३ कर्मचारी हजर होते. यावेळी सर्व उपस्थित अधिकाऱ्यांना निवडणुक प्रक्रियेबाबतची माहिती देण्यात आली. मतदान पारदर्शी व निष्पक्षपणे कसे होणार याचे प्रात्यक्षिक देखील यावेळी सर्व अधिकाऱ्यांना देण्यात आले. नागरिकांच्या आलेल्या सर्व शंकाचे समाधान करण्याचे देखील त्यांनी यावेळी सांगितले. जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी यावेळी आदर्श आचारसंहितेचे पालन करताना जिल्ह्यामध्ये कुठलीही अनुचित घटना घडणार नाही यासाठी सर्वानी काळजी घेण्याचे आवाहन केले.
यासोबतच निवडणूक वेबसाईटवर असणारी माहिती व वेळोवेळी निवडणूक आयोगाकडून येणाऱ्या आदेशाची अंमलबजावणी प्रत्यकाने करण्याबाबत निर्देश दिले. यावेळी निवडणूक आयोगातर्फे ॲप देखील सुरु करण्यात आले असून निवडणुकीच्या काळामध्ये सामान्य जनतेला देखील निष्पक्ष निवडणूक होण्यासाठी नवे व्यासपीठ निर्माण करण्यात आले आहे याबाबतचीही माहिती त्यांनी यावेळी दिली.
आज निवडणुक प्रशिक्षणाला ५९ कर्मचारी गैरहजर होते त्यांना कारणे दाखवा नोटीस अहेरी निवडणुक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी बजावली आली आहे.
निवडणूकीसंबंधी माहिती घेण्यासाठी जिल्ह्यात १९५० हा टोल फ्रि क्रमांक सुरु करण्यात आला असून कोणत्याही मोबाईल व फोनवरुन हा क्रमांक डायल करता येतो. त्यामुळे या टोल फ्री क्रमांकाचा नागरिकांनी लाभ घ्यावा, सर्व अधिकाऱ्यांनी १९५० या टोल फ्री क्रमाकांची माहिती यंत्रणेला द्यावी व सर्वानी या यंत्रणेचा लाभ घेण्यासाठी प्रयत्न करावे तसेच या निवडणूकीत मतदारांनी निर्भयपणे मतदान करावे असेही आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी केले.
निवडणूक काळामध्ये दिलेल्या जबाबदाऱ्या पार पाळणे, पदाधिकाऱ्याकडून शासकीय यंत्रणेचा वापर होऊ न देणे, मतदारांवर प्रभाव पाडणाऱ्या प्रचार साहित्यांबाबत दक्षता घेणे, वाहनांचा योग्य वापर करणे किती गरजेचे असते, हे आचारसंहितेतील नियमांचे दाखला देत अहेरी निवडणुक निर्णय अधिकारी मनोज लोणारकर यांनी यावेळी स्पष्ट केले.




