Ø नोडल अधिकाऱ्यांची आढावा बैठक
भंडारा, दि.3 ऑक्टोबर :- मतदान हा घटनेने दिलेला हक्क असून जिल्हा प्रशासन याबाबत मतदारांमध्ये जनजागृती करीत आहे. मात्र त्याचवेळी निवडणूक प्रक्रियेत गुंतलेले असल्यामुळे अनेक अधिकारी कर्मचारी मतदान करत नाहीत. असे होऊ नये यासाठी जिल्ह्यात निवडणूक प्रक्रियेत सहभागी सर्व मतदान कर्मचारी, पोलीस कर्माचारी, इतर अधिकारी, कर्मचारी आणि वाहनचालक यांनी टपाल मतपत्रिकेद्वारे मतदानाचा हक्क बाजावावा, अशा सूचना जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीप चंद्रन यांनी दिल्यात. जिल्हाधिकारी कार्यालायात आयोजित नोडल अधिकाऱ्यांच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.
लोकशाही प्रक्रियेत निवडणूक ही महत्वाची प्रक्रिया आहे. मात्र अनेकदा सर्व निवडणूक प्रक्रिया पार पडणारी यंत्रणाच मतदान करु शकत नाही . यासाठी 14 तारखेला होणाऱ्या शेवटच्या प्रशिक्षण कार्यक्रमात मतदान कर्मचारी म्हणून नेमणूक होणाऱ्या सर्व कर्मचारी, सुरक्षेसाठी तैनात पोलीस कर्मचारी, मतदान पेट्या आणि मतदान अधिकारी यांची वाहतुक करणारे वाहन चालक, नोडल अधिकारी, अशा सर्वांना पोस्टल बॅलेट मतदानाबाबत माहिती देऊन त्यांच्याकडून पोस्टल मतदान करून घेण्याचा सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्यात.
ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट चे पहिले सरमिसळ करून मतदान यंत्रे तीनही विधानसभा क्षेत्रात पाठविण्यात आले आहेत. तीनही निवडणूक निर्णय अधिकाऱयांनी दुसरी सरमिसळ 6 ऑक्टोबरला राजकीय पक्षांच्या उपस्थित आणि सामान्य निवडणूक निरीक्षक यांच्या समक्ष करुन घ्यावी. तसेच मतदान केंद्र अधिकारी कर्मचारी यांचे दुसरे प्रशिक्षण 14 तारखेला आयोजित करावे. तसेच सूक्ष्म निरीक्षक यांचे प्रशिक्षण सुद्धा निवडणूक निरीक्षक यांचे समोर घेण्यात यावे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी त्यांच्या क्षेत्रातील छायाचित्र मतदार चिठ्या चे वाटप मतदानाच्या 4 दिवस आधी करावे.
मतदान केंद्र अधिकारी चमू आणि मतदान यंत्रे मतदान केंद्रावर पोहचविण्यासाठी वाहनांची मागणी आधीच करावी. तसेच मतदान केंद्र अधिकारी – कर्मचारी यांची मतदानाच्या दिवशी जेवणाची व्यवस्था करण्यात यावी.
जिल्ह्यात असणारे तीन आंतर राज्य नाक्यांवर दोन ठिकाणी सी सी टी व्ही कॅमेरे तात्काळ लावून घेण्याच्या सूचना त्यांनी दिल्यात. दिव्यांग मतदार, वृद्ध, अंध, गर्भवती महिला यांच्यासाठी व्हीलचेअरची व्यवस्था पर्याप्त स्वरूपात करावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.
या बैठकीला निवासी उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. सुभाष पवार, उपविभागीय अधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, मनीषा दांडगे, सचिन संदगीर, खर्च नोडल अधिकारी मुख्य वित्त व लेखा अधिकारी योगेश जाधव, जिल्हा कोषागार अधिकारी शंकर बळी, दिव्यांग नोडल अधिकारी मंजुषा ठवकर, सूचना व विज्ञान अधिकारी संदीप लोखंडे, नगर प्रशासन अधिकारी श्री. गवळी, खनिकर्म अधिकारी सुरेश नैताम उपस्थित होते.




