गोंदिया,दि.03ः- ये्त्या विधानसभा निवडणुकीसाठी गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा-गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चारही विधानसभामतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हे उद्या शुक्रवारला सकाळी 10.30 वाजता आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याची माहिती भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष हेमंत पटले व संघटनमंत्री विरेंद्र अंजनकर यांनी दिली आहे.चारही विधानसभा मतदारसंघातील भाजप,शिवसेना व रिपाई(आठवले)गटाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी आपल्या मतदारसंघातील अधिकृत युतीच्या उमेदवाराच्या उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी मोठ्या संख्यने उपस्थित रहावे असे म्हटले आहे.गोंदिया येथील भाजपचे अधिकृत उमेदवार गोपालदास अग्रवाल यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गोंदियातील सर्कस मैदान येथून मोठी रॅली काढण्यात येणार आहे. तिरोडा-गोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार आमदार विजय रहागंडाले यांच्या उमेदवारी अर्ज सादर करण्यासाठी कमलकुंज असाटी समाज भवन (प्रेमबंधन लानच्या मागे असाटी पेट्रोल पंप जवळ ) तिरोडा येथून सकाळी 10:30 वाजे पदयात्रेला सुरवात करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघासाठी आमदार राजकुमार बडोले हे पक्ष कार्यकर्त्यांसोबत मिरवणुकीने आपला उमेदवारी अर्ज सादर करणार असल्याचे पक्षाच्यावतीने कळविण्यात आले आहे.





