28.9 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी महागली

नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी महागली

0
52

गोंदिया,दि.05ः-नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारी आता सर्वसामान्य पर्यटकांना परवडणार नाही. वन्यजीव विभागाने जंगल सफारीच्या दरात भरमसाठ वाढ केल्याने त्याचा बोजा पर्यटकांवर पडणार आहे. यामुळे या प्रकल्पांकडे वन्यप्रेमी पाठ फिरविण्याची शक्यता असून पर्यटनावर परिणाम होणार आहे.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात नागझिरा वन्यजीव अभयारण्य, न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्य, नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य, कोका वन्यजीव अभयारण्य व नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्राचा समावेश होतो. मागील वर्षीच्या तुलनेत आता जंगल सफारीसाठी दरवाढ करण्यात आली आहे. नागझिरा वन्यजीव व न्यू नागझिरा वन्यजीव अभयारण्यात प्रवेश करणार्‍या एका पर्यटकाला पूर्वीच्या ५५ रुपये प्रतिफेरीऐवजी १00 रुपये मोजावे लागणार आहेत. तर वाहन शुल्क १६५ ऐवजी ३00 रुपये करण्यात आले आहे. नवेगाव राष्ट्रीय उद्यान, नवेगाव वन्यजीव अभयारण्य व कोका अभयारण्यात प्रवेश शुल्क ३५ रुपयांऐवजी १00 रुपये करण्यात आले आहे. तर वाहन शुल्क ११0 रुपयांऐवजी ३00 रुपये करण्यात आले आहे. नवेगाव नागझिरा व्याघ्र राखीव क्षेत्रात स्थिर कॅमेर्‍यासाठी आधी ११0 रुपये मोजावे लागत होते. ते आता २00 रुपये करण्यात आले आहे. तर चल कॅमेर्‍यासाठी २७0 ऐवजी ४00 रुपये मोजावे लागणार आहेत. अनेक निसर्गप्रेमी वन्यप्राण्यांना पाहण्यासाठी, पशुपक्ष्यांचे निरीक्षण करण्यासाठी अभयारण्यात भटकंती करीत असतात. तसेच शालेय विद्यार्थ्यांना निसर्गातील घडामोडीतील बदल अनुभवण्यासाठी हे प्रकल्प मार्गदर्शक ठरले आहे. परंतु, आता दरवाढीमुळे अनेक पर्यटक पाठ फिरविण्याची शक्यता आहे. या व्याघ्र प्रकल्पात वाघांशिवाय बिबट, गवा, सांबर, चितळ, रानडुक्कर, अस्वल आदी वन्यप्राणी प्रामुख्याने आढळतात.
शासन पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी, तसेच रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष भर देत असते. मात्र, अभयारण्यातील जंगल सफारी महाग केल्याने पर्यटनावर तसेच त्यावर अवलंबून असणार्‍या रोजगारावर परिणाम होण्याची शक्यता आहे. तथापि, १ ऑक्टोबरपासून सदर व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुले होणार होते. परंतु सततच्या पावसामुळे १६ ऑक्टोबरपासून या व्याघ्र प्रकल्पातील जंगल सफारीला सुरुवात होणार आहे.

blank