29.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ भोंडेकर,वाघाये,वाघमारे अपक्ष रिंगणात,मुख्य उमेदवारांना धोका

भोंडेकर,वाघाये,वाघमारे अपक्ष रिंगणात,मुख्य उमेदवारांना धोका

0
64

भंडारा,दि.08ः-विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या आजच्या दिवशी काही बंडखोरांनी आपले अर्ज मागे न घेतल्यामुळे युती आणि आघाडीच्या अधिकृत उमेदवारांची डोकेदुखी वाढली आहे. तीनही विधानसभा क्षेत्रातून २७ जणांनी आपले अर्ज मागे घेतले असून ३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत.
या निवडणुकीत  उमेदवारी न मिळालेल्यांनी बंडखोरी करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. अर्ज मागे घेण्यासाठी बंडखोरांची पक्षश्रेष्ठींपासून मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, बंडखोरांनी आपले अर्ज कायम ठेवल्याने या निवडणुकीत चूरस वाढली आहे.
तुमसर विधानसभा क्षेत्रात एकूण १५ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. भाजपचे विद्यमान आमदार चरण वाघमारे यांना डावलून प्रदिप पडोळे यांना उमेदवारी दिल्याने वाघमारे यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली. त्यांच्या उमेदवारीमुळे भाजप उमेदवाराला फटका बसण्याची शक्यता असल्याने भाजपकडून आ. वाघमारे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न करण्यात आले. परंतु, आ. वाघमारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असल्याने त्यांनी उमेदवारी अर्ज कायम ठेवला. राष्ट्रवादीकडून इच्छुक असलेले माजी आमदार अनिल बावनकर यांना तिकीट नाकारल्याने त्यांनीसुद्धा अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. परंतु, त्यांनी आपला अर्ज मागे घेतला. याशिवाय योगेश सिंगनजुडे यांनी आपले अर्ज मागे घेतले आहे. त्यामुळे राष्ट्रवादीचे उमेदवार राजू कारेमोरे यांना दिलासा मिळाला आहे.मात्र पंकज कारेमोरे यांचा अर्ज कायम राहिला आहे. या विधानसभेतून एकूण १0 उमेदवार रिंगणात आहेत.
भंडारा विधानसभेत युतीची जागा रिपाइं (आठवले) व आघाडीची जागा पिरीपाला सोडण्यात आल्याने इच्छुकांची बंडाळी उफाळून आली. विद्यमान आमदार रामचंद्र अवसरे, माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी उमेदवारी दाखल केल्याने भाजप युतीच्या उमेदवाराच्या अडचणीत भर पडली होती. तथापि, आज आ. रामचंद्र अवसरे यांनी आपला अर्ज मागे घेतला. नरेंद्र भोंडेकर यांनी आपला अर्ज कायम ठेवल्याने ते निवडणूक लढणार आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पूजा ठवकर यांनीही आपली उमेदवारी मागे घेतल्याने अपक्ष नरेंद्र भोंडेकर यांना दिलासा मिळाला आहे. भंडारा विधानसभेत एकूण ११ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले असून १४ उमेदवार रिंगणात आहेत.
साकोली विधानसभेत सर्वाधिक २६ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. कॉंग्रेसचे नाना पटोले, भाजपचे डॉ. परिणय फुके यांच्यात थेट लढत असली तरी कॉंग्रेसचे बंडखोर माजी आमदार सेवक वाघाये हे वंचित बहुजन आघाडीकडून लढणार असल्याने कॉंग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे. आज अपेक्षेप्रमाणे डॉ. ब्रम्हानंद करंजेकर यांनी आपली उमेदवारी मागे घेतली. त्यांच्यासह अन्य १0 जणांनी आपले अर्ज मागे घेतले. त्यामुळे या विधानसभेत एकूण १५ उमेदवार रिंगणात आहेत.

61 भंडारा विधानसभा उमेदवार-१) अरविंद मनोहर भालाधरे – भाजपा,२) जयदीप जोगेंद्र कवाडे- कॉंग्रेस,३) दिलीप भजनदास मोटघरे – बसपा,४) लक्ष्मीकांत सत्यवान बोरकर – हिंदूस्थान जनता पार्टी,५) विसर्जन सज्जन चौसरे – वंचित बहुजन आघाडी,६) सुभाष बिसन भिवगडे – बहुजन मुक्ती पार्टी,७) इंजि. अजय रंगारी – अपक्ष,८) रंजित बाबूलाल चव्हाण-अपक्ष,९) नरेंद्र भोजराज भोंडेकर – अपक्ष,१0) नितीन पुंडलिक तुमाने – अपक्ष,११) प्रशांत बालक रामटेके – अपक्ष,१२) सुरेश मारोती भवसागर – अपक्ष,१३) सदानंद जानुजी कोचे – अपक्ष,१४) चंद्रशेखर परसराम सुखदेवे -अपक्ष.

62-साकोली विधानसभा उमेदवार-१) नानाभाऊ फाल्गुणराव पटोले – कॉंग्रेस,२) डॉ. परिणय रमेश फुके – भाजपा,३) डॉ. प्रकाश गणपतराव मालगावे – बसपा,४) आगाशे उर्मिला प्रशांत – बळीराजा पार्टी,५) गणेश अशोक खंडाते – गोंडवाना गणतंत्र पार्टी,६) पंकज नंदकुमार खेडीकर – जय महाभारत पार्टी,७) सेवकभाऊ निर्धन वाघाये- वंचित बहुजन आघाडी,८) संदीप सूर्यभान रामटेके – पीपल्स पार्टी ऑफ इंडिया,९) अतूल नारायण परशुरामकर – अपक्ष,१0) चोपराम शिवाजी तिवाडे- अपक्ष,११) महेशकुमार भोजराम भदाडे – अपक्ष,१२) राजू रामभाऊ निर्वाण- अपक्ष,१३) विजय महादेव खोब्रागडे – अपक्ष,१४)सुभाष रामचंद्र बावनकुळे – अपक्ष,१५)सुहासबाबू अनिल फुंडे- अपक्ष

60 तुमसर विधानसभा उमेदवार-१) छाया मुरलीधर गभने – बसपा,२) प्रदिप मोतिराम पडोळे – भाजपा,३) राजू माणिकराव कारेमोरे – राष्ट्रवादी,४) रविदास र्शावण लोखंडे – बहुजन मुक्ती पार्टी,५) विजय रामकृष्ण शहारे – वंचित बहुजन आघाडी,६) उषा पुरुषोत्तम केसलकर – अपक्ष,७) खेमराज काशिराम पंचबुद्धे- अपक्ष,८) चरण सोविंदा वाघमारे – अपक्ष,९) पंकज सुभाषचंद्र कारेमोरे – अपक्ष,१0) भोलाराम माणिक परशुरामकर – अपक्ष