27.4 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांचे प्रथम पूरक सरमिसळीकरण पूर्ण

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदान यंत्रांचे प्रथम पूरक सरमिसळीकरण पूर्ण

0
31
  • रिसोड विधानसभा मतदारसंघासाठी अतिरिक्त बॅलेट युनिट

वाशिम, दि. ०९ : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत ३३-रिसोड विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने या मतदारसंघातील प्रत्येक मतदान केंद्रावर २ बॅलेट युनिट (बीयू)ची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे रिसोड विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्रांसाठी आवश्यक अतिरिक्त बॅलेट युनिटचे वितरण करण्यासाठी आज सामान्य निवडणूक निरीक्षक प्रकाश बिंदू, कायदा व सुव्यवस्था निवडणूक निरीक्षक मोहम्मद रहेमान, निवडणूक खर्च निरीक्षक नरेंद्र सिंग आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी हृषीकेश मोडक यांच्या उपस्थितीत संगणकीय प्रणालीच्या सहाय्याने प्रथम पूरक सरमिसळीकरण प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

यावेळी उपजिल्हा निवडणूक अधिकारी संदीप महाजनमहसूलचे उपजिल्हाधिकारी तथा मतदान यंत्र व्यवस्थापन समितीचे नोडल अधिकारी अधिकारी रमेश काळेउपजिल्हाधिकारी तथा पुरवठा व सामग्री समितीचे नोडल अधिकारी राजेंद्र जाधवजिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी सागर हवालदार, तहसीलदार शीतल वाणी, नायब तहसीलदार प्रकाश डाहोरे यांच्यासह राजकीय पक्षांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

मतदान यंत्रांची प्रथम सरमिसळ प्रक्रिया करून जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघनिहाय मतदान केंद्राच्या १२६ टक्के जादा बॅलेट युनिट व कंट्रोल युनिट आणि १३० टक्के व्हीव्हीपॅटचे संबंधित मतदार संघांच्या निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना वितरण करण्यात आले आहे. एका बॅलेट युनिटवर नोटा’ पर्याय आणि १५ उमेदवारांची नावे समाविष्ट करता येऊ शकतात. मात्र रिसोड विधानसभा मतदारसंघात १६ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याने याठिकाणी प्रत्येक मतदान केंद्रांवर २ बॅलेट युनिटची आवश्यकता भासणार आहे. त्यामुळे रिसोड मतदारसंघातील ३३१ मतदान केंद्रांसाठी १२६ टक्के नुसार आवश्यक ४१९ अतिरिक्त बॅलेट युनिटचे वितरण करण्यासाठी प्रथम पूरक सरमिसळीकरण प्रक्रिया राबविण्यात आली. याद्वारे जिल्ह्यात उपलब्ध असलेल्या ५७४ राखीव बॅलेट युनिट पैकी ४१९ बॅलेट युनिट रिसोड विधानसभा मतदार संघासाठी उपलब्ध करून देण्यात आले. दुसऱ्या टप्प्यातील सरमिसळ प्रक्रिया विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी स्तरावर होऊन मतदान यंत्रांचे मतदान केंद्रनिहाय वितरण केले जाणार आहे.