30.7 C
Gondiā
Tuesday, August 4, 2026
Home विदर्भ जिल्हयातील 4751 दिव्यांग बांधव बजावणार मतदानाचा हक्क;11 ऑक्टोबरला  विविध कार्यक्रमाचे आयोजन

जिल्हयातील 4751 दिव्यांग बांधव बजावणार मतदानाचा हक्क;11 ऑक्टोबरला  विविध कार्यक्रमाचे आयोजन

0
26

गोंदिया दि.10 : येत्या 21 ऑक्टोबर रोजी विधानसभा सार्वत्रिक निवडणूकीसाठी मतदान होणार आहे. जिल्हयातील चारही मतदारसंघातील 4751 दिव्यांग मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. जिल्हयातील दिव्यांग मतदार बांधवांना मतदानाचा हक्क बजावता यावा यासाठी विविध जनजागृती कार्यक्रमाचे जिल्हयात 11 ऑक्टोबरला आयोजन करण्यात आले आहे.

जिल्हयातील अर्जुनी/मोरगाव विधानसभा मतदारसंघात 1229 दिव्यांग मतदार असून 113 अंध, 104 मुकबधीर, 881 अस्थिव्यंग व इतर प्रकारचे दिव्यांग 131, तिरोडा मतदारसंघात 1148 मतदार असून यामध्ये 127 अंध, 112 मुकबधीर, 768 अस्थिव्यंग व इतर प्रकारचे दिव्यांग 141, गोंदिया विधानसभा मतदारसंघात 968 दिव्यांग मतदार आहे यामध्ये 102 अंध, 608 अस्थिव्यंग आणि आमगांव विधानसभा मतदारसंघात 1406 दिव्यांग मतदार असून यामध्ये 171 अंध, 147 मुकबधीर, 645 अस्थिव्यंग व इतर प्रकारचे दिव्यांग असलेले 443 मतदार आहेत.त्या 11ऑक्टोबर रोजी जिल्हयातील आठही तालुक्याच्या ठिकाणी दिव्यांग मतदारासाठी ब्रेल लिपी इशारा भाषा दिव्यांग मतदारासाठी असलेल्या सोयीसुविधा, मतदान यंत्र व व्हीव्हीपॅट मशीनचे सादरीकरण करण्यात येणार आहे. या दिवशी आयोजित करण्यात येणाऱ्या रॅलीला सर्व निवडणूक निरीक्षक व जिल्हाधिकारी भेटी देणार आहे. सर्व तालुक्यातील संबंधित अधिकाऱ्यांनी समन्वयाने नियोजन करुन रॅली व अन्य कार्यक्रमाचे उत्कृष्ट आयोजन करावे असे आवाहन नोडल अधिकारी राजकुमार हिवारे यांनी केले आहे.

यानिमित्ताने या आयोजनासाठी जिल्हाधिकारी कार्यालय येथे आज बैठक घेण्यात आली. या बैठकीला नोडल अधिकारी तथा शिक्षणाधिकारी राजकुमार हिवारे, समाजकल्याणचे सहायक आयुक्त श्री वाडके, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हयातील दिव्यांग बांधवाचे संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित होते.