26.9 C
Gondiā
Monday, August 3, 2026
Home विदर्भ २५ वर्षांत प्रथमच निवडणुकांत पोलिस दलाची ऐतिहासिक कामगिरी

२५ वर्षांत प्रथमच निवडणुकांत पोलिस दलाची ऐतिहासिक कामगिरी

0
58

गडचिरोली,दि.26ः-मागील २५ वर्षांच्या इतिहासात प्रथमच गडचिरोली पोलिस दलाच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे विधानसभा निवडणुका विक्रमी मतदानासह निर्विघ्नपणे पार पडल्या आहेत. पोलिस दलाने केलेल्या उत्तम नियोजनामुळे निवडणुकीदरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्ह्यात विक्रमी ७0.२६ टक्के मतदान झाले असून, मतदानात जिल्हा राज्यात दुसर्‍या क्रमांकावर राहिला आहे. ही बाब अभिमानास्पद आहे, अशी माहिती पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी २५ ऑक्टोबर रोजी आयोजित पत्रकार परिषदेतून दिली.निवडणुकांच्या पार्श्‍वभूमीवर पोलिस विभागाने केलेल्या कामगिरीबाबत पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी माहिती दिली. पत्रकार परिषदेला अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. मोहितकुमार गर्ग उपस्थित होते.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे म्हणाले, दुर्गम भागातील आदिवासी जनेतेने नक्षलवादाला न जुमानता लोकशाहीवर आपला विश्‍वास दाखविला आहे. आदिवासी बांधवांनी मोठय़ा प्रमाणात बाहेर पडून मतदान केले आहे. विशेष म्हणजे नक्षल्यांनी बॅनर, पोस्टरबाजी करून अनेक भागातील आदिवासी जनतेला मतदान न करण्याचे आवाहन केले होते. यामध्ये मलमपोड्डूर व परिसरातील जनतेने नक्षल्यांनी लावलेले बॅनर जाळून नक्षल्यांचा निषेध केला होता. या परिसरात ६३.६३ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यासोबतच जिल्ह्यातील अनेक भागातील नागरिकांनी नक्षल्यांच्या आवाहनाला पायदळी तुडवून मतदान केले आहे. यामुळे नागरीकांच्या मनात नक्षल्यांबद्दल असलेली चिड पुन्हा एकदा अधोरेखीत झाली आहे, असेही पोलिस अधीक्षक बलकवडे म्हणाले.
दारूबंदी कायद्यान्वये २३७ गुन्हे दाखल, ७६ लाखांचा मुद्देमाल जप्त – पोलिस विभागाने लक्षलवादासोबतच जिल्ह्यातील इतरही अवैध धंद्यांवर करडी नजर ठेवली होती. निवडणूका दारूमुक्त पार पाडण्यासाठी पोलिस दलाने पथके तैनात केली होती. निवडणुकीच्या काळात दारूबंदी कायद्यान्वये एकूण २३७ गुन्हे दाखल करण्यात आले तर २३ हजार ६८१ लीटर दारू जप्त करण्यात आली. सोबतच ३0६ आरोपींकडून ७६ लाख ४0 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सीआरपीसी कायद्यानुसार एकूण ३९0 जणांवर तर मुंबई पोलिस कायद्यानुसार १0४ जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. गडचिरोली पोलिस दताले निवडणूक नियोजनबध्दरीत्या पार पाडताना मागील एक वर्षांपासून दुर्गम भागातील जनतेसाठी जनजागरण मेळावे, ग्रामभेटी, शांतता रॅली आदी माध्यमातून नाविण्यपूर्ण योजना राबविल्या. दुर्गम व अतिदुर्गम भागात जनतेसह शहरी भागातील जनतेच्या मनामध्ये गडचिरोली पोलिस दलाच्या प्रती विश्‍वास निर्माण होण्यास मदत मिळाली. त्याचबरोबर गडचिरोली पोलिस दलाने देखील निवडणूकीच्या काळात कुठेही अनुचित प्रकार घडणार नाही, याची खबरदारी घेतली. जनतेने नक्षलवाद्यांनी मतदान न करण्याच्या आवाहनाला न जुमानता भरघोस मतदान केले. यातून नक्षलवाद्यांना दुर्गम भागातील जनता पूर्णपणे विरोध करीत असल्याचे व लोकशाहीवर दृढ विश्‍वास असल्याचे दिसून येते.

जिल्हा नक्षलग्रस्त असल्याचे लक्षात घेत पोलिस दलासह विविध सुरक्षा दलाचे जवान जिल्ह्यात तैनात करण्यात आले होते. तब्बल १३ हजार ५00 जवानांनी मतदानाच्या काळात जिल्ह्यात कर्तव्य पार पाडले. दुर्गम भागातील मतदान पथके ने-आण करण्यासाठी हेलिकॉप्टरचा वापर करण्यात आला. कर्मचार्‍यांना सुरक्षित पोहचविण्यासाठी भारतीय वायुसेनेच्या ३ एम. आय. १७ आणि दोन पवनहंसच्या हेलिकॉप्टरची मदत घेण्यात आली. यामुळे दुर्गम भागात मतदान पथके पोहचविणे शक्य झाले.एकेकाळी नक्षल दलममध्ये राहून नक्षल्यांच्या मनसुब्यांमध्ये सहभागी झालेल्या व लोकशाही न मानणार्‍या ३८0 आत्मसमर्पीत नक्षल्यांनी विधानसभा निवडणुकीत मतदान केले. आत्मसमर्पीत नक्षल्यांनी उत्साहात मतदानाच्या प्रक्रियेत भाग घेतला.
पोलिस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी मतदानात नागरिकांनी दिलेल्या योगदानाबद्दल अभिनंदन केले आहे.निवडणूका निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी मेहनत घेतलेल्या अप्पर पोलिस अधीक्षक, सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, सर्व पोलिस ठाणे, उपपोलिस ठाणे, पोलिस मदत केंद्रांचे अधिकारी, कर्मचारी, सी – ६0 जवान व निवडणूक कार्यात महत्वाची जबाबदारी बजावलेल्या पोलिंग पार्टीमधील कर्मचार्‍यांचे अभिनंदन केले आहे