गोंदिया,दि.31 : जनतेने आपल्याला कामासाठी विजयी केले असून हा विजय जनतेचा असल्याचे सांगत नवनिर्वाचित आमदार विनोद अग्रवाल यांनी कामाला सुरुवात केली. शेतकरी, शेतमजुरांसह सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी धडपडणारे विनोद अग्रवाल यांना जनतेच्या समस्या मांडून त्या मार्गी लावण्याचे आमदारकीचे मोठे अस्त्र मिळाले आहे. सर्वसामान्यांच्या भावनांची जाण असल्याने विधानसभा निवडणुकीत विजयी होताच शेतकरी हिताकरिता आ. अग्रवाल कामाला लागले असून अवकाळी पावसाने गोंदिया विधानसभा क्षेत्रात झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतमालाची जी हानी झाली त्याबद्दल आमदार विनोद अग्रवाल यांनी आपल्या मुंबई दौऱ्यात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना तातडीने पंचनामे करून झालेले नुकसान शेतकर्यांना भरून देण्यात यावे अशी विनंती केली. त्या संबंधी जिल्हाधिकारी कादंबरी बलकवडे आणि तहसीलदार राजेश भांडारकर गोंदिया यांच्याशी दूरध्वनी ने संपर्क साधून प्रशासनाला पंचनामे करून लवकरात लवकर अहवाल शासन दरबारी मांडून शेतकर्यांना लवकरात लवकर नुकसान भरपाई देण्यात यावी अशा सूचना केल्या. अवकाळी पावसाने गोंदिया तालुक्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले असून नुकसान झालेल्या शेतकर्यांनी आपल्या शेतशिवारात झालेल्या नुकसानाची नोंद संबंधित तहसीलदारांकडे करून घ्यावी अशी विनंतीही आमदार विनोद अग्रवाल यांनी केली.





