सडक अर्जुनी,दि.04ः-शेतकर्यांनी सिंचनासाठी तयार केलेल्या कित्येक विहिरींना कठडे नसल्याने त्यात पडून वन्यप्राण्यांचा जीव जात आहे. त्यामुळे अशा विहिरींना कठडे लावण्याची मागणी वन्यजीवप्रेमी करीत आहेत.
नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेल्या बफरझोन परिसरातील शेतकर्यांचे शेतातील विहिरीत वन्यप्राणी पडून त्यांना जीव गमवावा लागत आहे. बफर झोन मध्ये मुरदोली ते गोरेगाव या ग्रामीण परिसरातील अनेक विहिरींना तोंडी नसल्याने मुरदोली-गोरेगाव राज्यमार्ग असून अनेक दुर्घटना घडतात. नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या आजूबाजूच्या परिसरात धाबेपवनी, एलोटी, जांभळी, रामपुरी, जब्बारटोला, तसेच सडक अर्जुनी वनपरिक्षेत्र अंतर्गत सौंदड परिसरात सिंदीबर्िी घाटबोरी, मुंडिपार, खोडशिवनी, घटेगाव, गिरोला, हेटी तसेच जांभळी (दोडके), शेंडा, कोसमतोंडी, कोहमारा, डोंगरगाव डेपो व रेंगेपार या वनक्षेत्रातील बफरझोन परिसरात अशा विहिरींचे प्रमाण जास्त आहे. या बफरझोन परिसरात अनेक विहिरींना तोंडी बनविल्या नाही. त्यामुळे अशा विहिरींना कठडे केल्यास वन्यप्राणी त्यात पडणार नाहीत.
वनविभागाच्या माध्यमातून दरवर्षी शेतकर्यांचे शेतातील विहिरींची माहिती सांगितली जाते. परंतु, विहिरींना कठडे केले जात नाही. सन २0१३-१४ पासून वनविभागाचे योजनेप्रमाणे सर्व विहिरींना वनविभागामार्फत कठडे बनविण्याचे उद्दीष्ट ठरले होते. मात्र, अनेक गावात वनविभागाच्या योजना कागदावरच राबविल्या जात आहेत. आजही अनेक दुर्घटना शेतकर्यांचे शेतातील विहिरीत घडूनही कुणीही शेतकरी समोर येत नाही. सडक अर्जुनी तालुक्यातील जांभळी, शेंडा व कोसमतोंडी परिसरात रानडुक्कर व अस्वलांच मोकळय़ा विहिरीत पडून मृत्यू झाल्याच्या घटना घडल्या आहेत. वनविभागाचे माध्यमातून फक्त त्या जीव गेलेल्या प्राण्यांचे पंचनामे करून विल्हेवाट केली जाते. वन्यप्राण्यांचे जीव वाचविण्यासाठी उपाययोजना करणे काळाची गरज आहे. सडक अर्जुनी तालुक्यातून नागपूर-रायपूर राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ गेला आहे. या मार्गावर देवपायली, डुग्गीपार, डोंगरगांव डेपो या गावाजवळील परिसरात सुद्धा अनेक प्राणी अपघात होऊन मृत्यूमुखी पडत असून आता ही नित्याचीच बाब झाली आहे. तालुक्यातील खोबा, कोकणा, कनेरी, मनेरी, बकी, मेंडकी, कोसबी, डुग्गीपार, मोगरा, मंदिटोला, मुशानझोरवा, खडकी, बाम्हणी, डोंगरगाव डेपो, पुतळी, शेंडा, जांभळी, दोडके, कोसमतोंडी आदी गावांच्या बफरझोन परिसरातील शेतकर्यांच्या शेतातील विहिरींची माहिती मागितली जाते पण, विहिरींना कठडे लावले जात नाही.





