- जिल्हास्तरावर कार्यवाहीचा आढावा
- पंचनाम्याची यादी ग्रामपंचायतीत प्रसिद्ध होणार
वाशिम, दि. ०५ : परतीच्या पावसामुळे जिल्ह्यात झालेल्या पिकांच्या नुकसानीचे पंचनामे ८ नोव्हेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार महसूल, ग्रामविकास व कृषि विभागामार्फत संयुक्तरित्या कार्यवाही करण्यात येत असून याबाबतचा आढावा घेण्यासाठी आज जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांची बैठक झाली. नुकसानग्रस्त प्रत्येक पिकांचे पंचनामे होतील, याची दक्षता घ्यावी. तसेच पंचनामे अधिक गतीने व गुणवत्तापूर्ण करण्याच्या सूचना यावेळी देण्यात आल्या.जिल्हा परिषदेच्या अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बन्सोड, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शंकर तोटावार यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती.
जिल्ह्यात परतीच्या पावसाने सोयाबीन पिकासह कापूस, फळपिके, भाजीपाल्याचे नुकसान झाले आहे. या नुकसानीचे पंचनामे करण्याची कार्यवाही युद्ध पातळीवर सुरु आहे. ८ नोव्हेंबर पर्यंत सर्व पंचमाने पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले असून त्यादृष्टीने तालुकास्तरीय यंत्रणांनी केलेल्या कार्यवाहीचा आढावा आज झालेल्या बैठकीत घेण्यात आला. पिकांच्या नुकसानीचे पंचनामे अधिक गतीने करावेत, तसेच सर्व पंचनामे गुणवत्तापूर्ण होतील, याची दक्षता घ्यावी. तालुकास्तरीय अधिकाऱ्यांनी स्वतः काही ठिकाणी भेटी देवून पंचनामे गुणवत्तापूर्ण होत असल्याची खात्री करावी, अशा सूचना या बैठकीत देण्यात आल्या.पीक नुकसानीचे पंचनामे पूर्ण झाल्यांनतर त्याची यादी संबंधित ग्रामपंचायतीमध्ये प्रसिद्ध करावी. या यादीमध्ये नाव नसल्यास अथवा ८ नोव्हेंबर पर्यंत पंचनामे न झाल्यास शेतकऱ्यांनी संबंधित गावाच्या तलाठी, कृषि सहाय्यक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.




