25.1 C
Gondiā
Saturday, August 8, 2026
Home विदर्भ 20 शेळ्या व 2 बोकड वाटप योजना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

20 शेळ्या व 2 बोकड वाटप योजना 30 नोव्हेंबरपर्यंत अर्ज आमंत्रित

0
117

       गोंदिया : मराठवाडा पॅकेजच्या धर्तीवर गोंदिया जिल्ह्यात सन 2019-20 या आर्थिक वर्षापासून 20 शेळ्या व 2 बोकड वाटप करणे ही नविन राज्यस्तरीय योजना राबविण्यात येत आहे. ही योजना जिल्ह्यात सर्व प्रवर्गासाठी सरसकट 50 टक्के अनुदानावर राबविण्यात येत आहे. या योजनेत 50 टक्के अनुदान गट स्थापनेच्या पहिल्या वर्षी पहिल्या सहा महिन्यात 25 टक्के व दुसऱ्या सहा महिन्यात उर्वरित 25 टक्के थेट लाभार्थीच्या बँक खात्यात जमा करण्यात येईल. या योजनेमध्ये 20 शेळ्या व 2 बोकड यांचा गट खरेदी व 450 चौ.फुट वाडा (गोठा) बांधकाम याकरीता अनुदान देणे प्रस्तावित आहे.

योजनेमध्ये 30 टक्के महिला व 3 टक्के दिव्यांग लाभार्थींना प्राधान्य देण्यात येईल. यासाठी लाभार्थीकडे वाडा बांधकामाकरीता व मोकळी जागा मिळून किमान 2000 चौ.फुट स्वत:ची जागा असणे आवश्यक आहे. एका कुटूंबातील एकाच व्यक्तीस या योजनेचा लाभ घेता येईल. तालुकास्तरीय पशुधन विकास अधिकारी (विस्तार), पंचायत समिती यांचेकडे सदर योजनेचा अर्ज विनामूल्य उपलब्ध आहे. शेतकरी बांधवांनी पंचायत समितीमध्ये जावून अर्जाचा नमूना प्राप्त करुन आवश्यक कागदपत्रासह परिपूर्ण भरुन पशुधन विकास अधिकारी (विस्तार) यांचेकडे 30 नोव्हेंबर 2019 पूर्वी जमा करावे.

योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थीची निवड झाल्यानंतर निवड आदेश प्राप्त झाल्यापासून 45 दिवसाच्या आत शेळी गटाची खरेदी करणे आवश्यक राहील. असे न केल्यास गटाची खरेदी न करणाऱ्या लाभार्थीचा अर्ज नोटीस देवून रद्द करण्यात येईल व प्रतिक्षा सूचिवरील लाभार्थीस या योजनेअंतर्गत लाभ देण्यात येईल. शेळी गटाची खरेदी लाभार्थीच्या पसंतीने पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाच्या प्रक्षेत्रावरुन करण्यात येईल. शेतकऱ्यांनी शेळी गट खरेदीपूर्वी वाडा (गोठा) बांधकाम पूर्ण करावे. योजनेअंतर्गत निवड करण्यात येणाऱ्या शेतकऱ्यांचे 3 दिवसांचे शेळीपालन विषयक प्रशिक्षण आयोजित करुन त्यांना व्यवसायाकरीता प्रशिक्षीत करण्यात येईल. लाभार्थीने हा व्यवसाय किमान तीन वर्षे करणे बंधनकारक राहील अन्यथा त्यांचेवर दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल. सदर योजनेच्या अधिक माहितीसाठी नजिकच्या पशुवैद्यकीय दवाखाना/तालुक्यातील पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती किंवा जिल्ह्यातील पशुसंवर्धन कार्यालयाशी संपर्क साधावा. तरी जिल्ह्यातील जास्तीत जास्त लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त, गोंदिया यांनी केले आहे.