24.8 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home विदर्भ १७00 शेतकरी करताहेत आदर्श सेंद्रिय शेती

१७00 शेतकरी करताहेत आदर्श सेंद्रिय शेती

0
91

गोंदिया,दि.08ः: रासायनिक खतांचा वाढता वापर आणि संकरीत बियाण्यांमुळे शेतीच्या लागवड खर्चात दिवसेंदिवस वाढ होत आहे. मात्र त्यातुलनेत हाती येणारे उत्पादन फार कमी असल्याने शेतकर्‍यांना शेती करणे परवडत नाही. शिवाय रासायनिक खातांच्या अतिवापरामुळे मानवी आरोग्यावर दुष्परिणाम होत आहे. यासर्वांना सक्षम पर्याय म्हणून पर्यावरण पूरक सेंद्रिय शेतीचा पर्याय पुढे येत आहे. जिल्ह्यातील १ हजार ७00 शेतकर्‍यांनी या शेतीची कास धरल्याचे दिलासादायक चित्र आहे.
अधिक उत्पादन घेण्याच्या लालसेमुळे रासायनिक खतांचा अधिक वापर केला जात आहे. परिणामी जमिनीची उत्पादकता कमी होत आहे. रासायनिक खते व किटकनाशकांच्या माध्यमातून घेतलेल्या पिकांमुळे कर्करोगाचे प्रमाण वाढत असल्याची बाब एका सर्वेक्षणानंतर पुढे आली आहे. यासर्व प्रकाराला पायबंद लावण्यासाठी सेंद्रिय आणि नैसर्गिक शेती करण्याचे आवाहन केले जात आहे. ही बाब आता शेतकर्‍यांना सुद्धा पटू लागल्याने ते देखील सेंद्रिय शेतीच्या लागवडीकडे वळू लागल्याचे चित्र आहे. प्रकल्प संचालक आत्मा अंतर्गत परंपरागत कृषी विकास योजना सेंद्रिय शेतीसाठी गोंदिया जिल्ह्यात २0 शेतकरी गट स्थापन करण्यात आले आहे. या २0 गटांमध्ये एक हजार ७00 शेतकर्‍यांचा समावेश आहे. या गटांना आत्माअंतर्गत प्रशिक्षण, शेतकरी सहल, तज्‍जञांचे मार्गदर्शन, सेंद्रिय किअकनाशक, बुरशीनाशक आणि सेंद्रिय खतांचे युनिट उभारण्याकरीता साहित्य व उपकरणे आदिंचे प्रशिक्षण दिले आहे. शेतकर्‍यांना पीजीएसमार्फत प्रमाणीकरण मिळण्यासाठी ऑनलाईन नोंदणी केली आहे. जेणेकरुन शेतकर्‍यांना उत्पादनाबाबत खात्रीशीर बाजारपेठ उपलब्ध होऊन आत्मविश्‍वास वाढले अशी सुविधा उपलब्ध करुन दिली जात आहे. या सर्व सुविधांमुळे जिल्ह्यातील तब्बल १ हजार ७00 शेतकरी आजघडीला सेंद्रीय शेतीतून धानाचे उत्पादन घेत आहेत.