तुमसर,दि.13ः-भारतीय राज्यघटनेने प्रदान केलेल्या मानवतावादी मूल्यांचे संवर्धन व जोपासना करणे हेच प्रत्येक भारतीयाचे आद्यकर्तव्य आहे. त्यासाठी प्रत्येकाने कसोशीने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन आयकर विभागाचे अधिकारी धनंजय वंजारी यांनी केले.
तुमसर शहरातील ज्योशाबा सोशल मिशन स्टडी सेंटर व छत्रपती फाऊंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या विद्यार्थी मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. ‘भारतीय संविधानाला अपेक्षित समाज, शिक्षण व रोजगार’ या विषयावर त्यांनी मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी गोंदिया येथील सामाजिक कार्यकर्त्या सविता बेदरकर उपस्थित होत्या. वंजारी पुढे म्हणाले, भारतातील सामाजिक व्यवस्था, शिक्षण व रोजगार याचा परस्परसंबंध आहे. तरुणांनी शिक्षणातून व्यवस्था परिवर्तन करण्याचे संस्कार मिळविले पाहिजे. यासाठी भारतीय संविधानाचा इंत्यभूत अभ्यास केला पाहिजे.
अध्यक्षीय भाषणातून सविता बेदरकर म्हणाल्या, व्यवस्था परिवर्तन करण्यासाठी सामाजिक, राजकीय व कौटूंबिक पातळीवरही समानता प्रस्थापित करावी लागेल. आज स्त्रियांच्या भूमिकेतही राजकीय जागृती होणे आवश्यक आहे. सत्ता परिवर्तनातूनही मोठी क्र ांती होऊ शकते, हे दुर्लक्षून चालणार नाही. त्यामुळे तरुणांनी सर्वांगिण बदलाची भूमिका घ्यावी.कार्यक्र मादर्यान तुमसरातील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच सेवाक्षेत्रात स्थान पटकाविणार्या विद्यार्थ्यांच्या पालकांचाही गौरव करण्यात आला. प्रास्तविक पंकेश बोंबार्डे यांनी तर ठराव वाचन अभिजित रामटेके यांनी केले.




