भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने फुले मार्केटमध्ये
. अवजड वाहनाला विशिष्ट वेळेत शहरात प्रवेश बंदी
. बालाजी मार्केटजवळ चार चाकी वाहनांची पार्कीग
वाशिम, दि. 27 : वाशिम शहराचा चारही बाजुने विस्तार होत आहे. भविष्यात या शहराला विविध समस्यांचा सामना करण्याची वेळ येवू नये व हे शहर सुंदर दिसावे यासाठी शहराच्या सौंदर्यीकरणात भर टाकण्यासाठी शहरातील नागरिकांच्या सहकार्यातून अतिक्रमणे हटवून योग्य त्याठिकाणी भाजीपाला व फळ विक्रीची दुकाने बसवून पार्कींगची देखील व्यवस्था करण्यात येईल असे जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक म्हणाले.
27 नोव्हेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात वाशिम शहरातील पार्कींग व वाहतूक व्यवस्थेबाबत आयोजित सभेत श्री. मोडक बोलत होते. यावेळी पोलीस अधिक्षक वसंत परदेशी, अपर पोलीस अधिक्षक विजयकुमार चव्हाण, वाशिम नगराध्यक्ष अशोक हेडा, उपाध्यक्ष बापू ठाकूर, व्यापारी संघटनेचे अध्यक्ष जुगल कोठारी, सचिव मनिष मंत्री, नगर पालीकेचे मुख्यधिकारी दिपक मोरे, फळ विक्रेता संघटनेचे अबरार मिर्झा, मो. मुस्ताफा यांची प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी मोडक यावेळी म्हणाले, शहरात रहदारीला तसेच वाहतूकीला अडथळा होत असलेली अतिक्रमणे काढण्याची कार्यवाही लवकरच सुरु होईल. रस्त्याच्या दोन्ही बाजुला असलेल्या दुकानाच्या अडिच मीटर आतच दुकान मालक व ग्राहकांची दुचाकी वाहने पार्कीग केलेली असावीत. यासाठी पांढरा पट्टा आखून पार्कीगची सीमा निश्चित करावी. पार्कीगचे उल्लघंन करणाऱ्या वाहन मालकांना पोलीसांनी दंड आकारावा त्यामुळे ते शिस्तीचे पालन करतील. कोणीही भाजीपाला आणि फळांची दुकाने रस्त्यावर लावणार नाही याकडे पोलीस विभाग आणि नगर पालीकेने लक्ष द्यावे. भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांसाठी फुले मार्केटची जागा निश्चित करण्यात आली आहे. त्याचठिकाणी ही दुकाने लावावीत असेही त्यांनी सुचविले.
भाजीपाला आणि फळ विक्रेत्यांनी अतिक्रमण करुन दुकाने थाटून विक्री करु नये असे सांगून श्री. मोडक म्हणाले, की त्यामुळे रहदारीला अडथळे निर्माण होणार नाही. रस्ते हे वाहतूकीसाठी कायम मोकळे असले पाहिजे. अवजड वाहने शहरात येतात त्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूकीस व रहदारीस अडथळे होतात. त्यामुळे आता ट्रक टर्मीनलची जागा सेलू रोडवर निश्चित केली आहे. अवजड वाहनांनी माल घेवून सकाळी 9 ते दुपारी 12 आणि सायंकाळी 4.30 ते सायंकाळी 7.30 वाजता दरम्यान शहरात प्रवेश करु नये. त्यामुळे शाळा महाविद्यालयात येणारे- जाणारे विद्यार्थी तसेच खरेदीसाठी बाजारपेठेत जाणाऱ्या नागरीकांना अडथळा होणार नसल्याचे त्यांनी सांगीतले. अकोला नाका ते पाटणी चौक तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते पाटणी चौक यादरम्यान वाहतूकीस अडथळा निर्माण होणार नाही अशाप्रकारे वाहनांची पार्कींग करण्यात यावी. यासाठी पोलीस विभागाच्या वाहतूक शाखेने विशेष लक्ष दयावे असेही जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगीतले.
वाशिम शहराला एक शिस्त लागावी आणि हे शहर सुंदर दिसावे यासाठी अतिक्रमण हटाव मोहिम लवकरच राबविणार असल्याचे सांगून पोलीस अधिक्षक परदेशी म्हणाले की, त्यामुळे सर्वांच्या सहकार्यातून पार्कींगची व्यवस्था, भाजीपाला व फळविक्रेत्यांना निश्चित जागा उपलब्ध होणार आहेत. मोकाट जनावरांमुळे वाहतूकीला अडथळा निर्माण होत आहे त्यामुळे त्या जनावरांच्या मालकांवर गुन्हे नोंदविण्यात येतील यासाठी नगरपालिकेने पुढाकार घ्यावा. रिक्षा स्टँडसाठी जागा उपलब्ध करुन देण्यासाठी देखील नगरपालिकेने लक्ष दयावे असेही त्यांनी सुचविले.
नगराध्यक्ष हेडा म्हणाले, जानेवारी 2020 अखेर वाशिम शहरातील अकोला नाका, पोलीस स्टेशन चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक व पुसद नाका येथे जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून सिग्नल आणि सि.सि. टिव्ही कॅमेरे लावण्यात येणार आहे. शहरातील वाहतूकीस व रहदारीस अडथळा ठरणारे अतिक्रमणे हटविण्यास नगरपालिका सर्वतोपरी सहकार्य करेल. शहरात आवश्यक त्याठिकाणी झेब्रा क्रॉसींग आणि साईनबोर्ड लावण्यात येतील. रहदारीस अडथळा ठरणाऱ्या वीज वितरण कंपनीच्या डिपी हटविण्यात याव्यात अशी सुचना करुन वाशिम शहरात कोंडवाडा नसल्यामुळे शहरातील मोकाट जनावरे पकडून गौशाळेत ठेवण्यात येतील असे सांगीतले.
यावेळी शहरातील पार्कींग व्यवस्था, अतिक्रमण हटाव, वाहतूक व्यवस्था, भाजीपाला व फळ मार्केटबाबत उपस्थितांनी काही सुचना केल्या. निश्चितपणे या सुचनांचा अंमलबजावणीच्या वेळी विचार करण्यात येईल असे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगीतले. चर्चेप्रसंगी वाशिम तहसिलदार, वाशिम शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक, वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक, वाशिम नगरपालिकेचे अभियंता उपस्थित होते.





