Ø दिवाळी अंक प्रदर्शन
भंडारा( जिमाका ), दि,27:- आताच्या पिढीला कदाचित दिवाळी अंकाचे महत्व माहित नसेल मात्र यापूर्वीच्या पिढीसाठी दिवाळी अंक अपूर्वाईचा विषय असायचा. दिवाळी अंकाची परंपरा महाराष्ट्राने अतिशय नेमस्थपणे जपली असून दिवाळी अंक म्हणजे विविधांगी साहित्याचा खजाना असल्याचे प्रतिपादन शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या प्राध्यापक सुलभा मुळे यांनी केले.
शासकीय जिल्हा ग्रंथालय अधिकारी यांच्या वतीने जिल्हा ग्रंथालय येथे दिवाळी अंकाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले होते. या प्रदर्शनाच्या उदघाटन प्रसंगी त्या बोलत होत्या. जिल्हा माहिती अधिकारी रवी गिते हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. जात पडताळणी विभागाचे संशोधन अधिकारी संभाजी पोवार, पत्रकार ज्ञानेश्वर मुंदे व जिल्हा ग्रंथालय अधिकारी खुमेंद्र बोपचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
संविधान दिनाचे औचित्य साधून जिल्हा ग्रंथालय कार्यालयात दिवाळी अंकाची प्रदर्शनी लावण्यात आली होती. कार्यक्रमाच्या सुरुवातील संविधान दिनाच्या निमित्ताने राज्य घटनेच्या उद्देशिकेचे वाचन करण्यात आले. 26 नोव्हेंबर रोजी मुंबई येथे झालेल्या हल्ल्यात शहीद झालेल्या जवानास श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. श्रीमती सुलभा मुळे यांनी दिवाळी अंकाचे महत्व सांगतानाच राज्यघटनेच्या विविध पैलूंचे विवेचन आपल्या भाषणात केले.
यावेळी बोलतांना संभाजी पोवार म्हणाले आपल्या देशाचा कारभार ज्या मुलतत्वावर आधारित आहे. तो ग्रंथ म्हणजे राज्यघटना ‘आम्ही नागरिक ’ अशी सुरुवात राज्यघटनेच्या उद्देशिकेत करण्यात आली आहे. नागरिक म्हणून असणारे अधिकार व कर्तव्य राज्यघटनेत नमुद आहेत. विविध समुदाय, घटक, जाती, धर्म व नागरिक यांचा सर्वांगिण विचार राज्यघटनेत करण्यात आला आहे. आकाराणे जगात सर्वात मोठी घटना असली तरी ती जगात सर्वोत्तम अशी राज्य घटना असल्याचे पोवार म्हणाले. प्रत्येक नागरिकाने राज्यघटना आपल्या घरात ठेवावी व तिचे नियमित पारायण करावे, असे ते म्हणाले.
नागरिकांचे मुलभूत अधिकारांना राज्यघटनेने खूप महत्व दिले आहे. राज्यघटनेमुळेच आपण आज खरे स्वातंत्र्य उपभोगत आहोत. स्पर्धा परिक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांनी राज्यघटनेचा केवळ परिक्षेपुरता अभ्यास न करता आपल्या आचरणात ती आणावी. सोबत जिल्हा ग्रंथालय कार्यालयाने उपलब्ध करुन दिलेल्या दिवाळी अंकाचे सामुहिक वाचन करुन आपल्या ज्ञानाच्या कक्षा रुंदावाव्यात, असे रवी गिते व ज्ञानेश्वर मुंदे यांनी आपल्या भाषणात सांगितले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक खुमेंद्र बोपचे यांनी केले तर संचालन संजय नारनवरे यांनी केले. स्पर्धा परिक्षा देणारे विद्यार्थी यावेळी उपस्थित होते.




