गोंदिया,दि.२८-नगर परिषदेतील मोफत नळ जोडणी योजनेच्या घोटाळा उघडकीस आला असून याप्रकरणात कुठलेही काम न करता नगरपरिषद मुख्याधिकारी चंदन पाटील यांच्या संगनमताने १ कोटी २६ लाख रुपयाचे वितरण संबधित कंत्राटदार गज्जू नागदवनेला दिल्याचे समोर आले आहे.याप्रकरणाची तक्रार जिल्हाधिकारी यांना केल्यानंतर चौकशी अधिकारी म्हणून विनोद जाधव व उपविभागीय अधिकारी यांना नेमण्यात आले.ही चौकशी वेगाने करुन दोषीवंर कारवाई करण्यात यावी या मागणीला घेऊन आज गुरुवारला(दि.२८)नगरपरिषद कार्यालयासमोर युवक काँग्रेसच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले.
पाणी पुरवठा विभागाचे कनि. अभियंता शेंडे व कंत्राटदार गज्जू नागदवने यांची २२ नोव्हेंबर रोजी चौकशी सुरू करण्यात आली आहे. यात १ कोटी २६ लाखांचे देयक कंत्राटदाराला अदा करण्यात आले असून ते साहित्य खरेदीसाठी देण्यात आल्याची माहिती समोर आली.त्या रकमेचे साहित्य खरेदी करण्यात आले का? कंत्राटदाराच्या खात्यातून कोणाच्या नावे धनादेश देण्यात आले? साहित्याची शहानिशा व बिलाची चौकशी झाल्यानंतरच हे समोर येणार असून चौकशी दरम्यान साहित्य ठेवण्याची जागा ही मरारटोली येथील सांस्कृतिक भवनातील एक कक्ष दाखविण्यात आले.यातील साहित्य कोणाचे आहे व खरे प्रकरण काय? हे लवकरच उजेडात येणार आहे.
या धरणे आंदोलनात प्रदेश काँग्रेस सचिव अमर वराडे,एड.नामदेवराव किरसान,सुनील भालेराव,पक्ष नेता शकील मंसुरी,भागवत मेश्राम, सुनिल तिवारी, क्रांती जायस्वाल, देवा रूसे,हरिष तुळसकर,आलोक मोहंती,दिलीप गोपलानी,छोटु पंचबुध्दे,अमर राहुल,आदिल पठाण आदी सहभागी झाले होते.




