गोंदिया दि. 5 :: जिल्हाधिकारी डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या संकल्पनेतून जिल्हा प्रशासनाच्या वतीने नाविण्यपूर्ण उपक्रम ‘शोध क्षमतेचा,ग्रामीण ऊर्जेचा’ ही स्पर्धा परीक्षा व्याख्यानमाला सुरु करण्यात आलेली आहे. या व्याख्यानमालेअंतर्गत प्रत्येक महिन्यात दर शुक्रवारला तज्ज्ञ वक्ते/अधिकाऱ्यांमार्फत मार्गदर्शन करण्यात येते. त्यानुसार तेराव्या सत्राचे आयोजन 7 डिसेंबर रोजी दुपारी 12 वाजता डॉ.बाबासाहेब आंबेडकर सार्वजनिक वाचनालय, तिरोडा येथे करण्यात आले आहे. सदर व्याख्यानमालेकरीता तिरोडा उपविभागीय अधिकारी गंगाधर तळपादे व तिरोडा न.प.मुख्याधिकारी विजय देशमुख हे प्रमुख मार्गदर्शक म्हणून उपस्थित राहणार आहेत.तरी तिरोडा जिल्ह्यातील विशेषत: ग्रामीण भागातील स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या/इच्छुक असलेल्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या व्याख्यानमालेचा अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण गोंदिया यांनी केले आहे.
13 डिसेंबरला केटीएस रुग्णालयात कर्करोग निदान शिबीर
गोंदिया : भारतामध्ये कर्करुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. प्रारंभिक लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे अनेकांना मृत्यूला सामोरे जावे लागते. वेळीच निदान झाल्यास कर्करोगापासून बचाव होवू शकतो. यासाठी केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालय गोंदिया येथे 13 डिसेंबर रोजी सकाळी 11 पासून ते दुपारी 2 पर्यंत कर्करोग निदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. शिबिराचे आयोजन दंत विभाग (क्र.22) ओपीडी परिसरात तपासणी करण्यात येईल. या शिबिरामध्ये लघवी आणि शौचच्या वेळी रक्त जाणे, वारंवार रक्ताची कमतरता होणे, थकवा तसेच कमजोरी येणे, खोकलतांनी रक्त येणे, स्तन भागी गाठ, मासिक पाळीच्या वेळी अती रक्तस्त्राव, गिळतांनी त्रास, गळ्यात किंवा शरीराच्या इतर ठिकाणी गाठ तसेच तोंडात पांढरा चट्टा, लाल चट्टा, तोंडातील 15 दिवसापेक्षा जास्त असलेली व्रण (जखम), जिभेवर किंवा गालावरील गाठ इत्यादी लक्षणे आढळल्यास तपासणी करुन निदान करण्यात येईल. या शिबिरामध्ये दत्ता मेघे वैद्यकीय महाविद्यालय सावंगी (वर्धा) येथील कर्करोग तज्ञ चमू व केटीएस जिल्हा सामान्य रुग्णालयातील तज्ञ यावेळी सेवा देणार आहेत. तरी वरीलप्रमाणे लक्षणे आढळल्यास या शिबिराचा संबंधितांनी अवश्य लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा शल्यचिकित्सक, केटीएस सामान्य रुग्णालय, गोंदिया यांनी केले आहे.
16 डिसेंबरला महिला लोकशाही दिन
गोंदिया : जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी महिला लोकशाही दिन साजरा करण्यात येतो. महिलांच्या कोणत्याही विभागाशी संबंधित वैयक्तीक समस्या, गाऱ्हाणी व अडीअडचणी ऐकून घेण्यासाठी 16 डिसेंबर रोजी सकाळी 11 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली महिला लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले आहे. या लोकशाही दिनामध्ये सर्व महिला कर्मचारी, महिला मंडळ, बचतगट व इतर महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था येथील महिला थेट सभेमध्ये येवून वैयक्तीक तक्रार नोंदवू शकतात. अर्जाचा नमूना जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय, प्रशासकीय इमारत, तिसरा मजला, खोली क्र.36, जयस्तंभ चौक, सिव्हील लाईन, गोंदिया या कार्यालयात नि:शुल्क प्राप्त होईल. अधिक माहितीसाठी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी कार्यालय गोदिया येथे संपर्क साधावा.





