गडचिरोली,दि.0५ः-भामरागड अंतर्गत येणार्या पोलीस मदत केंद्र लाहेरी हद्दीतील लाहेरी-धोडराज मार्गावर नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने लावले १५ कि.ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन निकामी करून नक्षल्यांच्या घातपाताचा डाव उधळला. यामुळे मोठा अनर्थ टळला.
२९ व ३0 नोव्हेंबर रोजी अबुझमाड जंगल परिसरात पोलीस दलाच्या जवानांनी नक्षलवादी प्रशिक्षण तळ उदध्वस्त केले. यावेळी मोठय़ा प्रमाणात नक्षल साहित्य तसेच दस्ताऐवज हस्तगत करण्यात आले होते. मिळालेल्या दस्ताऐवजावरून पोलीस दलाने उपविभाग भामरागड अंतर्गत येणार्या पोमके लाहेरी हद्दीतील लाहेरी ते धोडराज रस्त्यावर शोध अभियान राबवित असताना सदर रस्त्यावर नक्षल्यांनी घातपाताच्या उद्देशाने पुरून ठेवलेले अंदाजे १५ कि.ग्रॅ. वजनाचे क्लेमोर माईन आढळून आले. घटनास्थळी बॉम्ब शोधक व नाशक पथक तत्काळ पोहचून क्लेमोर माईन घटनास्थळीच निकामी करण्यात यश प्राप्त केले. याबाबत लाहेरी पोलीस ठाण्यात अ.क्र. 0५/१९ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास गडचिरोली पोलीस दल करीत आहेत. बॉम्ब शोधक व नाशक पथकाचे तसेच सर्चिंग करून क्लेमोर माईन शोधून काढणार्या पथकाचे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी अभिनंदन करून दोन्ही पथकाला पारितोषिक घोषित केले आहे.





