गडचिरोली,दि.२४: केंद्र सरकारने पारित केलेल्या नागरिकत्व सुधारणा विधेयकाच्या विरोधात आज गडचिरोलीत हजारो मुस्लिम बांधवांनी मोर्चा काढून हे विधेयक रद्द करण्याची मागणी केली.सुरुवातीला इंदिरा गांधी चौकातील सभास्थळी मुस्लिम व अन्य नेत्यांची भाषणे झाली. प्रसिद्ध वक्ते प्रा.जावेद पाशा यांनी नागरिकत्व सुधारणा विधेयक हे भारतीय राज्यघटनेच्या कलम १४,१५ व २१ चे उल्लंघन असून, हा कायदा धर्मनिरपेक्षतेला इजा पोहचवितो. त्यामुळे हा कायदा रद्द करावा, अशी मागणी केली. माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, एजाज शेख व अन्य वक्त्यांचीही यावेळी भाषणे झाली. या कायद्यामुळे अल्पसंख्याक समुदायामध्ये भीती निर्माण झाल्याने हा कायदा तत्काळ रद्द करावा, अशी मागणी त्यांनी केली.
त्यानंतर मुख्य मार्गाने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात मुस्लिम बांधवांसह विविध सामाजिक संघटना व राजकीय पक्षांचेही कार्यकर्ते सहभागी झाले होते. त्यात प्रामुख्याने हाजी इब्राहिम, हाजी रहमतुल्ला, सय्यद बाबू कादरी, वसीम खान, समशेर खॉ पठाण, रहीम भाई, लियाकत सय्यद, मुबारक सय्यद, सोहेल पठाण, अहबाज शेख, समीर पठाण, जुबेर खान, जागीश पठाण शकिला बानो पठाण, जमीर कुरेशी, हबीब खॉ पठाण, अॅड.बेग, अब्दू रहीम, अन्वर भाई, फारुख भाई, आसिफ सुफी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष माजी आमदार डॉ.नामदेव उसेंडी, माजी प्रदेश सचिव हसनअली गिलानी, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष भावना वानखेडे, वंचित बहुजन आघाडीच्या माला भजगवळी, राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे रुचित वांढरे, काँग्रेस नेत्या डॉ.चंदा कोडवते, काँग्रेसचे शहराध्यक्ष नगरसेवक सतीश विधाते, युवक काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष महेंद्र ब्राम्हणवाडे आदींचा समावेश होता. मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहचल्यानंतर तेथे अॅड. बेग व अन्य वक्त्यांची भाषणे झाली. त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले. या मोर्चात जिल्ह्यात सर्व तालुक्यांतील मुस्लिम पुरुष, महिला व विद्यार्थी सहभागी झाले होते.





