सविधानाचा अभ्यास केल्यानेच सर्वांगिण विकास शक्य-  नाना पटोले

0
29

भंडारा, दि.30 : या देशाच्या संविधानाने मानवी  जीवनाला लोकशाहीनुसार प्रत्येक नागरिकाला समान जगण्याची ताकद दिली आहे. सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासामुळे समाजाची प्रगती शक्य असून त्याकरीता संविधानाने दिलेल्या अधिकाराची जाणीव देशातील प्रत्येक नागरिकाला असणे आवश्यक आहे म्हणून संविधानाचा अभ्यास करा व त्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी देशातील सर्व जनतेला दिलेल्या शिका, संघटीत व्हा व संघर्ष करा या मंत्राचा उपयोग करुन सर्वांगिण विकासाचे लक्ष प्राप्त  करा. तेव्हाच खऱ्या अर्थाने संविधान साक्षर अभियान यशस्वी झाल्याचे निष्पन्न होईल, असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.लाखनी तालुक्यातील लाखोरी ग्राम येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था ( बार्टी ) पूणे, समाजकल्याण विभाग व ग्रामपंचायत कार्यालय लाखोरी यांच्या संयुक्त विद्यमाने अभियानाचा समारोपीय कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, त्यावेळी ते बोलत होते.

या कार्यक्रमास लाखनी पंचायत समितीचे सभापती खुशाल गीदमारे, जि.प. सदस्य ज्ञानेश्वर रहांगडाले, सहाय्यक आयुक्त समाजकल्याण आशा कवाडे, तहसिलदार मलिक विराणी, बार्टीचे विभागीय  प्रकल्प संचालक पंकज माने, समता दूत विभाग प्रकल्प संचालिका प्रज्ञा वाघमारे, खंड विकास अधिकारी धीरज पाटील, सरपंच अंजिरा गणवीर, उपसंरपंच पूनेश्वर सिंगणजूडे, समता दूत व ग्रामपंचायतचे पदाधिकारी उपस्थित होते.

विधानसभा अध्यक्ष पटोले पुढे म्हणाले की, बहूजनाची जनगणना झाली पाहिजे, सविधानाच्या माध्यमातून दिलेल्या अधिकारातून कुणाही नागरिकाला वंचित ठेवता येत नाही. भौतिक विकासानेच प्रश्न सुटणार नाहीत तर समाजातील प्रत्येक नागरिकाला व्यक्ती स्वातंत्रय, अन्न पूर्तता, सर्वसामान्य, गोरगरीब, शेतकरी व मजूरापर्यंत पोहचविण्याची जबाबदारी शासनाची आहे. त्या  करीता हे शासन कटिबध्द आहे. या शासनाने शेतकऱ्यांची सरसकट कर्जमुक्ती करण्याची हमी दिली असून 2 लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी करण्याची ग्वाही मुख्यमंत्री यांनी दिली आहे. शेतकऱ्यांना कर्जमुक्ती सोबतच चिंतामुक्त करण्यासाठी ही हे शासन वचनबध्द असल्याचे पटोले यांनी सांगितले. धानाला बोनस सहित 2540 रुपये पर्यंतचे मुल्य मिळाले असून ही सुरुवात आहे. धानाला समर्थन मुल्य वाढविण्यासाठी प्रयत्न करणार असून गोसेखुर्दच्या दुसऱ्या टप्प्याची योजना विकसित करुन भंडारा व गोंदिया जिल्हयातील सिंचन समस्या मार्गी लावून शेतीवर आधारित उद्योग निर्मिती करुन बेरोजगारांना रोजगार उपलब्धतेसाठी आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.संविधान साक्षर ग्राम अभियानाअंतर्गत लाखोरी येथे रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा व आरोग्य शिबीराचे आयोजन करण्यात आले. तसेच संविधान संबंधी जनजागृती करण्यात आली. स्पर्धेतील विजेत्यांना बार्टीकडून प्रमाणपत्र व संविधानाची प्रत अध्यक्ष नाना पटोले यांच्या हस्ते देण्यात आली, कार्यक्रमाचे प्रास्ताविक पंकज माने यांनी केले तर आभार हद्य गोडबोले यांनी मानले. या प्रसंगी मोठयासंख्येने परिसरातील ग्रामवासी उपस्थित होते.