मतदार यादी विशेष पुनरिक्षण कार्यक्रमास मुदतवाढ

0
16
  • १३ फेब्रुवारी पर्यंत मतदार पडताळणी कार्यक्रम
  • मतदारांनी पडताळणीसाठी सहकार्य करण्याचे आवाहन

वाशिम, दि. ३१ : भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०२० या अर्हता दिनांकावर आधारित छायाचित्रांसह मतदार यादीचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम ११ नोव्हेंबर रोजी घोषित केला आहे. या कार्यक्रमाला मुदतवाढ देण्यात आली असून १३ फेब्रुवारीपर्यंत ‘स्वीप’च्या मदतीने आणि मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणीकरण सारख्या इतर पुर्व-पुनरिक्षण कार्यक्रमाद्वारे मतदार पडताळणी कार्यक्रम (ईव्हीपी) हाती घेण्यात आला आहे. २८ फेब्रुवारी २०२० रोजी एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार असून २८ फेब्रुवारी ते २७ मार्च २०२० या कालावधीत दावे व हरकती स्वीकारण्यात येतील. या दरम्यान ७ व ८ मार्च २०२० आणि १४ व १५ मार्च २०२० या दिवशी विशेष मोहीम राबविली जाईल.

१५ एप्रिल २०२० पूर्वी सर्व दावे व हरकती निकाली काढण्यात येतील. २४ एप्रिल २०२० पूर्वी प्रारूप मतदार यादीच्या मापदंडांची तपासणी करणे आणि मतदार यादीच्या अंतिम प्रसिद्धीकरिता आयोगाची परवानगी घेण्याची कार्यवाही करण्यात येणार आहे. ३० एप्रिल २०२० पूर्वी डेटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्यात येणार आहे. ५ मे २०२० रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्ध करण्यात येईल, तरी जिल्ह्यातील नागरिकांनी या वेळापत्रकानुसार आपली नावे मतदार यादीत समाविष्ट करणे, वगळणे, दुबार, स्थलांतरीत, मयत मतदारांची नावे वगळणे याबाबत प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याकडे विहित नमुन्यातील अर्ज भरुन देवून करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले आहे.

मतदार यादीमध्ये मृत/स्थलांतरित मतदारांची नावे असल्याबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे मोहीम स्वरुपात सर्व मतदारांचा तपशील व छायाचित्रे दुरुस्त व प्रमाणित करण्यासाठी १३ फेब्रुवारी २०२० पर्यंत मतदार पडताळणी कार्यक्रम राबविला जाणार आहे. यामध्ये नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने पुढे येवून भारतीय पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, आधार कार्ड, रेशन कार्ड, सरकारी/निम-सरकारी अधिकाऱ्यांचे ओळखपत्र, बँक पासबुक, शेतकऱ्याचे ओळखपत्र, पॅन कार्ड, एनजीआर अंतर्गत आरजीआयने जारी केलेले स्मार्ट कार्ड आणि पत्त्यासाठी अर्जदाराच्या अथवा त्यांच्या जवळच्या नातेवाईकाच्या जसे पालकांच्या नावे असलेल्या पाण्याचे अथवा टेलीफोन अथवा वीज अथवा गॅस जोडणीचे सध्याचे बिल यापैकी एका कागदपत्राची प्रत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ)कडे  देवून त्यांच्या सध्या असलेल्या मतदार तपशिलांचे प्रमाणीकरण करावे.मतदार पडताळणी कार्यक्रमांतर्गत नागरिक ‘मतदार हेल्पलाईन’ मोबाईल अॅपद्वारे, एनव्हीएसपी पोर्टलद्वारे, सामान्य सेवा केंद्रांवर (सीएससी) भेट देवून किंवा भरलेल्या अर्जाची हार्ड कॉपी बीएलओमार्फत मतदार नोंदणी अधिकारी यांच्याकडे सादर करून त्यांचे मतदार तपशील तपासू शकतील, असे जिल्हाधिकारी कार्यालयाने कळविले आहे.