- केंदावर शेतकऱ्यांचे नुकसान होता कामा नये
- ऑफलाईन धान उचलण्याची व्यवस्था
- पुढील वर्षापासून धान खरेदी व्यवस्थेत सुधारणा करणार
- धान खरेदी व मिलिंग सोबतच
भंडारा,दि.3:- धान खरेदी केंद्रावर आलेले शेतकऱ्यांचे धान तात्काळ खरेदी करण्याची व्यवस्था करण्यात यावी. ऑनलाईन ऐवजी ऑफलाईन धान उचलण्यात यावे, तसेच धान खरेदी व्यवस्थेत शेतकऱ्यांचा फायदा करणारी व्यवस्था निर्माण करण्याच्या सूचना विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी प्रशासनाला दिल्या. आमगाव व लाखनी येथे धान खरेदी केंद्राची पाहणी केल्यानंतर ते बोलत होते. आमदार राजू कारेमोरे, अन्न व नागरी पुरवठा विभागाचे सहसचिव श्री. सुपे, पणन विभागाचे व्यवस्थापकीय संचालक योगेश म्हसे, जिल्हाधिकारी एम. जे. प्रदीपचंद्रन, माजी आमदार नाना पंचबुद्धे, तहसीलदार अक्षय पोयाम, जिल्हा पणन अधिकारी खाडे, दुध संघाचे अध्यक्ष रामलाल चौधरी व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
आज आमगाव ता. भंडारा, कृषी उत्पन्न बाजार समिती लाखनी व श्रीराम भात गिरणी साकोली येथे त्यांनी भेट देऊन पाहणी केली. अवकाळी पावसामुळे धान खरेदी केंदावर आलेले शेतकऱ्यांचे धान खराब होता कामा नये, याची काळजी घेण्यात यावी, अशा सूचना नाना पटोले यांनी केल्या. शेतकऱ्यांचे धान मोजून घेण्यास विलंब होत असल्याने धान ओला होऊन खराब होत असल्याचे ते म्हणाले. ऑनलाईन धान खरेदीत तांत्रिक अडचण येत असल्याने उशीर होत आहे. ही अडचण लक्षात घेता ऑनलाइन खरेदी तातडीने करण्याचे निर्देश त्यांनी दिले. पुढील वर्षांपासून धान खरेदी व्यवस्थेत सुधारणा करण्यात येणार असून शेतकऱ्यांच्या मोबाईलवर टोकण नंबर देण्याची व्यवस्था केली जाणार आहे. त्याचप्रमाणे धान खरेदी व मिलींग सोबतच करण्यात येईल अशी व्यवस्था निर्माण केली जाईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे धान अनेक दिवस पडून राहणार नाही. शेतकऱ्यांचा फायदा करणारी व्यवस्था निर्माण केली जाणार असुन खरेदी प्रक्रिया अधिक सोपी व सुटसुटीत करण्यावर भर दिला जाणार आहे, असे त्यांनी सांगितले.
धान खरेदी केंदावर अतिरिक्त हमाली घेण्यात येत असल्याची बाब काही शेतकऱ्यांनी लक्षात आणून दिली असता शेतकऱ्यांच्या खिशाला हात लागणार नाही याची खबरदारी घेण्याच्या सूचना पटोले यांनी यावेळी केल्या. गोदाम बांधकामाचा आराखडा तयार करण्यात येत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. बाजार समितीने आपली जबाबदारी योग्य रित्या पार पाडावी अशा सूचनाही त्यांनी दिल्या. अन्यथा बाजार समितीवर जबाबदारी निश्चित करण्यात येईल, असे ते म्हणाले. धान खरेदी केंद्र वाढवून देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली. या भेटीत नाना पटोले यांनी शेतकरी व खरेदी संस्था यांचे प्रश्न व समस्या जाणून घेतल्या.





