25.4 C
Gondiā
Wednesday, July 1, 2026
Home विदर्भ सायबर गुन्हयासंदर्भात महिलांनी सतर्क व जागरुक रहावे – मृणालिनी वंजारी

सायबर गुन्हयासंदर्भात महिलांनी सतर्क व जागरुक रहावे – मृणालिनी वंजारी

0
60

Ø  विकृत मानसिकता बदला,Ø  ‘सायबर सेफ वुमन व महिला सुरक्षा’   कार्यशाळा,Ø  क्रांतीज्यांती सावित्रीबाई फुले यांची 189 वी जयंती साजरी

भंडारा (3 जानेवारी 2020) :-  महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच डिजीटल युगात इंटरनेटच्या माध्यमातून अनेक प्रकारचे गुन्हे होत आहेत. यामध्ये विशेषत: महिला व बालकांविरुध्दच्या गुन्हयांचा समावेश आहे. इंटरनेटच्या मदतीने महिलांचे लैगिंक शोषण, फसवणूक आदि गुन्हे होत असून सायबर गुन्हयासंदर्भात महिलांनी अधिक सतर्क व जागरुक राहण्याची आवश्यकता आहे. अशी फसवणूक होत असल्याचे लक्षात येताच तातडीने पोलीसांची मदत  घेण्याचे आवाहन  सहाय्यक पोलीस निरिक्षक मृणालिनी वंजारी यांनी  केले.

जिल्हा माहिती कार्यालय, महिला आर्थिक विकास महामंडळ व महाराष्ट्र सायबर पोलीस यांच्या संयुक्त विद्यमाने   ‘सायबर सेफ वुमन व महिला सुरक्षा’  विषयावर कार्यशाळेचे आयोजन सामाजिक न्याय भवन सभागृह, भंडारा येथे करण्यात आले. यावेळी  त्या बोलत होत्या. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक अधिकारी प्रदीप काथोळे, माहिती विभागाचे सुनिलदत्त जांभूळे, श्रीमती पडोळे, श्रीमती. खोब्रागडे, अरुणा बांते प्रामुख्याने उपस्थित होते. सायबर सेफ वुमन ही मोहिम आज राज्यभरात राबविण्यात आली असून या मोहिमेअंतर्गत भंडारा जिल्हयात जे.एम. पटेल कॉलेज तसेच साकोली येथे सुध्दा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

महिला व बालकांवर होणारे अत्याचार तसेच सायबर गुन्हे रोखण्यासाठी व त्या अत्याचारांसदर्भात तसेच कायद्यासंदर्भात माहिलांनी जागरुक असणे आवश्यक आहे.  हैद्राबाद प्रकरण तसेच निर्भया हत्याकांडांसारखे  गुन्हे समाजात होत आहेत. त्यामुळे महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर झाला आहे. इंटरनेटचा सतत वापर केल्याने मुलांमध्ये हिंसक भावना निर्माण होत असून मुलांना अशा विकृत मानसिकतेपासून पालकांनी परावृत्त करावे. तरच अशा घटना घडणार नाही. असे मृणालिनी वंजारी यांनी सांगितले. यासाठी महिलांनीही  जागरुक राहणे अत्यंत गरजेचे आहे, असेही त्या म्हणाल्या.

श्रीमती वंजारी पुढे म्हणाल्या की, समाजाची मुलीं व महिलांबद्दलची मानकिता बदलणे गरजेचे आहे. योग्य व्यासपिठ न मिळाल्याने ग्रामीण भागातील मुली मागे राहतात. अशा मुलींना सायबर गुन्हयांना मोठया प्रमाणात सामोरे जावे लागते.  पालकांनी मुलामुलीमध्ये भेदभाव करु नये. तसेच  भेदभाव रहित जीवन जगण्यास आपल्या पाल्यांना सांगून  महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार त्यांच्यावर करावे.  आजच्या परिस्थितीत महिलांनी पती परमेश्वर न समजता बेस्ट फेंड समजावे म्हणजे त्यांच्यात असलेला गैरसमज दूर होईल.  कुटूबात पूरुष- महिला समानतचे संस्कार रुजवावेत, असेही त्या म्हणाल्या. महिलांना स्वयंसंरक्षण करण्याचा अभ्यास करावा. अत्याचार प्रकरणी पोलीस स्टेशन मध्ये तक्रार करावी , घाबरु नये, त्यामुळे अशा घटनेस आळा बसेल.  निर्भिड बना, शासन अलर्ट आहे. तसेच खोटी तक्रार दिल्यास गुन्हा दाखल  होऊ शकतो, त्यामुळे कायद्याचा गैरवापर  टाळा, असा सल्ला त्यांनी महिलांना दिला.

प्रदीप काथोळे यांनी कौटूंबिक हिसाचार व महिला विकासाबाबत सांगितले की, आज क्रांतीज्यांती सावित्रीबाई फुले यांच्या 189  जयंतीनिमित्त जो कार्यक्रम आयोजित करण्यात आला. त्यामध्ये महिलांनी कूटूंबात चागले सस्कार करावे. श्रीमंती शिक्षणाने येते. शिक्षणाच्या प्रबोधनाची आवश्यकता आहे,  तरच कूठलीही महिला अशिक्षित राहणार नाही.  त्यासाठी येणारी पिढी घडवा. स्त्रीशक्ती जागृत करा. सावित्रीने केलेल्या संघर्षामुळेच आज महिलांना 50 टक्के आरक्षण मिळत असून राजकीय क्षेत्रात सुध्दा ग्रामपंचायत सरपंच, पंचायत समिती सदस्य जिल्हा परिषद सदस्य, ते थेट जिल्हा परिषद अध्यक्षपर्यंत महिला आरक्षण लागू करण्यात आले आहे व महिला मोठमोठया पदावर आरुढ झाल्या आहेत. मुलांमुलींना चांगले संस्कार शिकविण्याचा संकल्प करा, असे त्यांनी सांगितले.

प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते क्रांतीज्योती सोवित्रीबाई फुले यांच्या जयंती निमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन दीप प्रज्वलित करण्यात आले. यावेळी महिला बचत गटाच्या महिलांनी ‍सांस्कृतिक कार्यक्रमात सहभागी होऊन महिला सक्षमीकरणाचा प्रत्यय दिला. उपस्थितांचे आभार श्रीमती खोब्रागडे यांनी मानले. या कार्यक्रमास माहिलाबचत गटाच्या महिला, अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी , विद्यार्थीनी मोठया संख्येने उपस्थित होते.